‘पेट’साठी चार वर्षांनंतर अखेर विद्यापीठाला सापडला मुहूर्त; वेळापत्रक जाहीर
By विजय सरवदे | Published: June 30, 2024 11:55 AM2024-06-30T11:55:28+5:302024-06-30T12:00:02+5:30
आताची ६वी ‘पेट’ही ३३ विषयांसाठी घेतली जाणार आहे; १ जूलैपासून ऑनलाईन नोंदणी
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन २०२१ नंतर आता ६ वी ‘पीएच.डी. एन्ट्रेन्स टेस्ट’ (पेट) घेण्याचा निर्णय असून यासाठी १ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. मागच्या परीक्षेप्रमाणे यावेळीही सप्टेंबर महिन्यात ‘ऑनलाइन’ परीक्षा घेतली जाईल. यासाठी पदव्यूत्तर पदवी (‘बी प्लस’ श्रेणी उत्तीर्ण) विद्यार्थी हे नोंदणी करु शकणार आहेत.
कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या ‘पेट’साठी प्रकुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली आणि वेळापत्रकास अंतिम मान्यता देण्यात आली. एकूण ३३ विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा व वाणिज्य या शाखांचा समावेश असेल.
‘पेट’ यशस्वी करण्यासाठी डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. संजय साळुंके, डॉ. वैशाली खापर्डे, डॉ. वीणा हुंबे, संचालक डॉ. भालचंद्र वायकर हे चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता प्रयत्नशील आहेत. तत्कालीन कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात सन २०१० मध्ये १ली ‘पेट’ घेण्यात आली. त्यानंतर २०१३, ०१६, २०१८ आणि २०१२१ मध्ये ही परीक्षा झाली. मागील ५वी पेटचा पहिला पेपर जानेवारी २०२१, तर दुसरा पेपर १३ मार्च २०२१ रोजी झाला होता. ५वी ‘पेट’ ४५ विषयांसाठी घेण्यात आली व त्यात ४ हजार २९९ विद्यार्थी पात्र झाले होते. आताची ६वी ‘पेट’ही ३३ विषयांसाठी घेतली जाणार आहे. १ जुलैपासून ‘पेट’साठी नोंदणी सुरु होणार असून त्याच दिवशी विषयनिहाय संशोधकांच्या रिक्त जागांची संख्या उपलब्ध होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी केले आहे.
असे राहील ‘पेट’चे वेळापत्रक
- ऑनलाईन नोंदणी ०१ ते २० जुलै
- कागदपत्रांची पडताळणी २८ जुलै ते ८ ऑगस्ट
- प्राथमिक यादी जाहीर १४ ऑगस्ट रोजी
- अंतिम यादी जाहीर १९ ऑगस्ट रोजी
- ‘पेट’ परीक्षा १ सप्टेंबर रोजी
- निकाल जाहीर १२ सप्टेंबर रोजी