मुलीच्या आत्महत्येनंतर पित्यानेही संपविली विष पिऊन जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:22 AM2019-03-15T00:22:41+5:302019-03-15T00:22:55+5:30
हृदयद्रावक : वाडी बनोटी परिसरावर शोककळा
बनोटी : एकतर्फी प्रेमाचा घेतलेला आळ सहन न झालेल्या इयत्ता दहावीच्या मुलीने आत्महत्या केल्याच्या पाचव्या दिवशी तिच्या पित्यानेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना सोयगाव तालुक्यातील वाडी बनोटी येथे गुरुवारी (दि.१४) घडली. छोटू गव्हाणे (४५) असे मृत पित्याचे नाव आहे.
पाच दिवसांपूर्वी दिव्या गव्हाणे या दहावीच्या विद्यार्थिनीने गावातील पाच जणांनी एकतर्फी प्रेमाचा आळ घेऊन मारहाण केल्याने राहत्या घरात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती. त्या दिवसापासून तिचे वडील कुणाशीही बोलत नव्हते. गुरुवारी पहाटे चार वाजता लवकर उठून ते घरातून निघून गेले. दुपारपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. वाडी शिवारातील शेतात त्यांचा पुतण्या जितेंद्र गव्हाणे हा शेतात गेला असता त्याला छोटू यांचा मृतदेह आढळून आला. त्याने हे दृश्य पाहून नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर पोलीस, नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेऊन मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राजपूत यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पाटील सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद रोडगे, ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, योगेश झाल्टे, दीपक पाटील करीत आहेत.
आई, वडील, बहिणीचे छत्र हरपल्याने दोन्ही बालके पोरके
मुलीचा विरह व झालेला अपमान सहन न झाल्याने बाप-लेकीचा असा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. आई, बहिणीच्या पाठोपाठ वडिलांचेही छत्र हरवल्याने दोन्ही बालके (एक १२ वर्षांचा मुलगा व एक ८ वर्षांची मुलगी) पोरके झाले आहेत. मृत दिव्याच्या आईचे यापूर्वीच निधन झालेले आहे.