दागिने विकल्यानंतर सोनारानेच सोनाराला लुटले; तिघे अटकेत, ९ किलो चांदी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:52 PM2022-07-07T12:52:46+5:302022-07-07T12:53:12+5:30
गुन्हे शाखेकडून गुन्हा उघड: पाच जणांचे कृत्य, तीन जणांना बेड्या आणि ९ किलो चांदी जप्त
औरंगाबाद : आसेगावहून माळीवाड्याकडे येत असलेल्या फुलंब्रीच्या सोनाराला दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवून साडेचार किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना रविवारी घडली होती. यात ज्या सोनाराला चांदीचे दागिने दिले, त्याने मित्रांच्या सहाय्याने सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटल्याचे उघडकीस आले. पाचपैकी तीन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. या दरोडेखोरांकडून ८ किलो ८८१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले.
सोन्याचे व्यापारी नितीन साहेबराव घाडगे (रा.फुलंब्री) हे आसेगाव येथे दागिने देऊन माळीवाड्याकडे येत होते. तेव्हा त्यांना लुटण्यात आले. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने गुन्ह्यांचा समांतर तपास करताना दागिने दिलेल्या आसेगाव येथील जय मातादी ज्वेलर्सच्या मालकावर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच हॉटेल रायगडमधील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर ‘जय मातादी’चा मालक शरद नानासाहेब पवार (रा. गंधेश्वर, ता. कन्नड, ह.मु. माळीवाडा) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
सोनाराला लुटण्याचा प्लॅन पवार याने मित्र नंदकुमार हरिचंद्र निळे (रा. शरणापूर) याच्यासोबत बनवला होता. रविवारी घाडगे हे पवारच्या दुकानात दागिने देऊन निघाल्यानंतर निळेच्या दुचाकीवरून प्रवीण फकीरचंद पवार (रा. शरणापूर), आनंद राजपूत ऊर्फ लकवाल (ह.मु. बिडकीन, रा. जांभळीवाडी, ता. पैठण) आणि गुड्डु आरण (रा. घोडेगाव, ता.नगर) या तिघांनी रायगड हॉटेलजवळ आल्यानंतर घाडगे यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करीत डोक्याला बंदूक लावली. तसेच जवळील दागिन्यांची बॅग हिसकावून घेत दुचाकीवर पोबारा केला होता. शरद पवार, नंदकुमार निळे आणि प्रवीण पवार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
ही कामगिरी पो.नि. आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि. मनोज शिंदे, हवालदार संतोष साेनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, रवींद्र खरात, विलास मुठे, नितीन देशमुख, दत्तात्रय गढेकर, संजयसिंग राजपूत, विठ्ठल सुरे, विजय भानुसे, संदीप बीडकर, अजहर कुरेशी, ज्ञानेश्वर पवार आणि अजय चौधरी यांच्या पथकाने केली.
लोकेशन अन् चारचाकीमुळे जाळ्यात
पवार याने व्यापारी घाडगे यांना लुटण्याचा प्लॅन बनवला होता. घाडगे यांनी त्याच्या दुकानात चांदीचे दागिने दिले. त्या दागिन्यांचे पैसेही त्याने दिले. त्याच वेळी तत्काळ जायचे असल्याचे सांगून तो दुकानातून बाहेर पडला. ठरल्यानुसार पवार याने स्वत:ची चारचाकी गाडी काढली. पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून संबंधितांना व्हाॅट्सॲप कॉल केले. घटनेनंतर पोलिसांनी चौकशीसाठी पवारला बोलावले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्हे शाखेचे सपोनि. शिंदे यांनी हॉटेलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये लुटणाऱ्या दुचाकीवरील तिघांचा व्यापारी घाडगे पाठलाग करीत होते. त्याच वेळी एक चारचाकी कमीजास्त वेगात पाठीमागून येत होती. चारचाकी गाडीविषयी माहिती काढल्यानंतर ती पवारचीच निघाली. तसेच त्याच्याकडे बंदूक असल्याची गुप्त माहिती मिळाली. घटनेच्या वेळी पवारचे लोकेशन तपासल्यानंतर ते घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर निघाले. त्यामुळे संशय बळावला आणि ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
हा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेने आरोपी निळे याच्या घरातून चांदीचे १३ कडे, जोडव्याचे १२० जोड, गळ्यातील ५४ चेन, ७३ ब्रासलेट, १ हजार ३७५ अंगठ्या असा एकूण ८ किलो ८८१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. त्याची किंमत ५ लाख ३२ हजार ८६० रुपये होती. त्याशिवाय इतरही मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यात दरोड्याचे कलम वाढविले आहे.