छेडछाड प्रकरणात २४ तासांत तपास करत पोलिसांनी आरोपीविरुद्ध जमा केले भक्कम पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:58 PM2021-02-10T12:58:00+5:302021-02-10T16:02:52+5:30
Molestation case; crime news शिवाजीनगर येथील तरुणाने दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता.
औरंगाबाद : तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, पीडिता आणि आरोपींचे मोबाइल टॉवर लोकेशन, तब्बल आठ साक्षीदारांचे जबाबसह भक्कम पुराव्यानिशी २४ तासांत आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयांत दोषारोपत्र सादर केले.
शिवाजीनगर येथील तरुणाने दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिंदेसह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस तपासाला लागले आणि घटनास्थळ पंचनामा केला, आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी आरोपी आणि पीडिताचे मोबाइल लोकेशन काढून तांत्रिक पुरावा हस्तगत केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविले. पीडिता आणि आरोपी यांच्यातील वाद एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या मोबाइलमध्ये कैद केला होता. ही मोबाइल क्लीप पुरावा म्हणून पोलिसांनी हस्तगत केली. पीडितेचा पाठलाग करण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. याबाबतचा जप्ती पंचनामा करून आरोपीविरुद्ध २४ तासांत दोषारोपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. फौजदार विठ्ठल घोडके, यांनी हा तपास केला. हवालदार रमेश सांगळे, शिवाजी गायकवाड यांनी त्यांना मदत केली.
आरोपी शिंदे सुटला जामिनावर
आरोपी शिंदेला अटक करुन पोलिसांनी दोषारोपपत्रासह त्याला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले. यावेळी तपास पूर्ण झाल्यामुळे त्याला जामिनावर मुक्त करावे, अशी विनंती त्याच्या वकिलांनी न्यायालयास केली. न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांच्या वयक्तिक जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. यामुळे तो जामिनावर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडितेचा न्यायालयासमोर नोंदविला जबाब
विनयभंगाच्या या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी पीडितेला वारंवार न्यायालयात येण्याची आवश्यकता भासू नये याकरिता पोलिसांच्या विनंतीनुसार मंगळवारी सकाळी न्यायालयाने तिचा जबाब (कलम १६४ नुसार ) नोंदवून घेतला.