देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 31, 2023 07:07 PM2023-03-31T19:07:16+5:302023-03-31T19:07:33+5:30
छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती
छत्रपती संभाजीनगर : शहराकडून बीडकडे जाताना अवघ्या २० किमी अंतरावर भालगावात श्री रामचंद्र मठ आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींंनी स्वत: ३९३ वर्षांपूर्वी श्रीराम व सीतेच्या मूर्तीची स्थापना केली. येथील मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘वामांकारूढ सीता’ म्हणजे रामाच्या मांडीवर बसलेली सीतेची पंचधातूची दुर्मीळ अशी मूर्ती आहे.
भालगावात एकीकडे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. त्याच्या पूर्व बाजूस भालगावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. तो रस्ता सरळ श्रीरामचंद्र मठापर्यंत जाऊन पोहोचतो. डाव्या बाजूस एक जुना चिरेबंदी वाडा दिसतो. तोच श्री रामदास स्वामींनी स्थापित केलेला ‘श्री रामचंद्र मठ’ आहे. या मठात एका गाभाऱ्यात काळ्या सागवानी लाकडाचे मोठे देवघर दिसते. त्याच देवघरात श्रीराम व सीतेची पंचधातूची मूर्ती नजरेस पडते. याशिवाय श्रीरामाच्या उजव्या बाजूला हनुमान, तर सीतेच्या डाव्या बाजूला गरुडाची मूर्तीही लक्ष वेधून घेते. त्यानंतर बालाजी, देवीच्या मूर्ती येथे आहे. देवघराच्या दोन्ही बाजूला पितळाची ५ फुटी समई तसेच समोरील बाजूस दगड्याच्या समई दिसतात. याच मंदिरात काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो.
देशात दोनच मूर्ती
श्रीरामरक्षा स्तोत्रमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘ वामांकारूढ सीता’ १) भालगाव येथील श्रीरामचंद्र मठातील हीच ती श्रीराम-सीतेची पंचधातूची मूर्ती.
२) श्री रामचंद्र मठाचा चिरेबंदी वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार. म्हणजे श्रीरामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी पहिली मूर्ती जालना जिल्ह्यातील ‘जांब’ या त्यांच्या जन्मस्थानी व दुसरी मूर्ती छत्रपती संभाजीनगरातील भालगाव येथे आहे.
११०० मठांपैकी एक भालगावात
स्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० ठिकाणी मठाची स्थापना केली होती. त्यातील एक भालगावचा श्रीरामचंद्र मठ आहे. हा मठ सुकना नदीच्या काठावर उभारला आहे. त्याकाळी निजामाची खडकी (छत्रपती संभाजीनगर) ही राजधानी असल्याने येथील राजकीय हालचालींवर लक्ष रहावे, या हेतूने स्वामींनी भालगावात मठ उभारला होता.
त्र्यंबकराज हे मठाचे पहिले महंत
भालगावात श्रीरामचंद्र मठाची स्थापना करून श्री रामदास स्वामी यांनी त्यांचे पट्ट शिष्यांपैकी एक असलेले त्र्यंबकराज (भोळाराम) यांना मठाचा महंत नेमून ते पुढे टाकळीला रवाना झाले. भोळाराम यांच्या नावावरून नंतर या गावाला भालगाव नाव पडले. त्यांच्या नंतर हरिहर देशमुख, रघुवीर स्वामी, खंडेराव स्वामी असे महंत झालेत. सध्याचे सुरेश स्वामी जहागिरदार हे नवव्या पिढीतील आहेत. आता या कुटुंबाची दहावी पिढी आपल्या पूर्वजांचा धार्मिक वारसा पुढे नेत आहे.