केबीसीपाठोपाठ ‘फिनिक्स’कडूनही हिंगोली शहरात अनेकांना गंडा
By Admin | Published: July 16, 2014 11:57 PM2014-07-16T23:57:12+5:302014-07-17T00:27:37+5:30
हिंगोली : दामदुप्पटीचे अमिष दाखवून विविध स्किमद्वारे एका कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार एका तक्रारीवरून समोर आला आहे.
हिंगोली : दामदुप्पटीचे अमिष दाखवून विविध स्किमद्वारे एका कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार एका तक्रारीवरून समोर आला आहे. त्यात ‘फिनिक्स रियलकॉन गोल्ड’ या कंपनीचे चालक असलेल्या एका दाम्पत्याने फसवणूक केल्याची तक्रार शेषराव अर्जून चाटसे यांनी दिली. त्यावरून हा प्रकार समोर आल्याने केबीसीपाठोपाठ आता फिनिक्सच्या तपासाचे आव्हान हिंगोली पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
ठाणे शहरातील रहिवासी असलेल्या श्रावण गणपत माने आणि त्याची पत्नी सविता माने यांची ‘फिनिक्स रियलकॉन गोल्ड’ नावाची कंपनी आहे. दामदुप्पटीचे अमिष दाखवून अनेक स्कीमच्या नावाखाली या कंपनीने अनेकांचे पैसे घेतले आहेत. त्यासोबत २०१० या वर्षी हिंगोली तालुक्यातील इंचा येथील शेषराव अर्जुन चाटसे यांनी देखील पैसे गुंतविले. प्रत्येक महिन्याला ११०० रूपयांचा हप्ता चाटसे यांनी चार वर्ष भरला. मुदत संपल्यानंतर दुप्पटीने मिळणाऱ्या पैशांची मागणी केली असता कंपनीने चाटसे यांना चेक दिला; परंतु बँकेच्या खात्यात पैसे नसल्याने दिलेला चेक बाऊंस झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे चाटसे यांच्या लक्षात आले. तद्नंतर चाटसे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून नुकतीच कंपनीविरूद्ध तक्रार दिली. त्यात चाटसे यांनी तयार केलेल्या १२५ खातेदारांचा पैसा या कंपनीत गुंतविल्याचे नमूद केले आहे. चाटसे यांच्या तक्रारीवरून हिंगोली पोलिसांनी ‘फिनिक्स रियलकॉन गोल्ड’ कंपनीचे चालक माने दांम्पत्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. मागील वर्षभरापासून केबीसीच्या फसवणूकीचे एकएक प्रकरण बाहेर येत असताना चाटसे यांच्या तक्रारीवरून हिंगोली पोलिस चक्रवून गेले. केबीसी प्रकरणाच्या तपासाचे आव्हान निर्माण झाले असताना फिनिक्समुळे पोलिसांचे काम वाढणार आहे. (प्रतिनिधी)