महिलेचा खून करून प्रेत तलावात फेकले
By Admin | Published: April 1, 2016 12:50 AM2016-04-01T00:50:32+5:302016-04-01T01:03:06+5:30
तामलवाडी : तीस वर्षीय अपंग महिलेचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत एका पोत्यात बांधून तलावात टाकून दिल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा तलावात गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
तामलवाडी : तीस वर्षीय अपंग महिलेचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत एका पोत्यात बांधून तलावात टाकून दिल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा तलावात गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उजव्या हाताने अपंग असलेल्या या महिलेचे प्रेत एक पोत्यात घालून तसेच या पोत्यात दगड भरून ते या तलावात टाकून देण्यात आले होते. गुरूवारी सकाळी पाण्यावर हे प्रेत पोत्यासह तरंगत असताना आढळून आल्यानंतर गोंधळवाडी येथील होमगार्ड नवानथ पांडुरंग दुधाळ यांनी तातडीने तामलवाडी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. घटना समजताच सपोनि मिर्झा बेग, पोउपनि सुरेश शिंदे, तानाजी माने, जयराम राठोड, पद्मभूषण गायकवाड, राजेंद्रसिंह ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्रेत पोत्यासह पाण्याबाहेर काढले असता आत चार मोठे दगड आढळून आले. या महिलेच्या अंगावर काळ्या रंगाचा बुरखा, उजवा हात अपंग व हातात मनगटी घड्याळ असल्याचेही निदशनास आले.
याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि मिर्झा बेग करीत आहेत. या घटनेमुळे तामलवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासन परिपत्रकानुसार खुनाच्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी पंच म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना घेतले जाते. गुरूवारी सांगवी-माळुंब्रा तलावात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पंचनामा करण्यासाठी बीट अंमलदार जयराम राठोड, राजाभाऊ ठाकूर हे माळुंब्रा जि. प. शाळेत दोन शिक्षकांना बोलाविण्यासाठी गेले होते. परंतु, प्रभारी मुख्याध्यापक संजय गोरे यांनी पंच म्हणून शिक्षकांना पाठविण्यास नकार दिला. यानंतर सांगवी (काटी) जि. प. शाळेतील मुख्याध्यापिका छाया जोशी यांनी दोघा शिक्षकांना पाठविल्यानंतर दुपारी बारा वाजता पंचनामा करण्यात आला. (वार्ताहर)