प्रेमविवाहानंतर पतीचे अफेअर, नैराश्यात विवाहिता ४ महिन्यांच्या मुलासह पोहचली रेल्वेरुळावर
By राम शिनगारे | Published: January 12, 2023 08:11 PM2023-01-12T20:11:32+5:302023-01-12T20:12:54+5:30
आंतरजातीय प्रेमविवाहानंतर सुखी संसार सुरु असताना पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
औरंगाबाद : चार महिन्याच्या बाळाला घेऊन २४ वर्षांची विवाहिता रेल्वेस्टेशन परिसरात फिरताना वेदांंतनगर पोलिसांनी आढळली. निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना संशय आल्यामुळे त्यांनी विवाहितेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेव्हा त्या विवाहितेला पतीच्या इतर महिलेसोबतच्या अनैतिक संबंधामुळे रेल्वेसमोर आत्महत्या करायची असल्याचे समजले. निरीक्षक गिरी यांनी दामिनी पथकाला बोलावुन घेत बाळासह विवाहितेला पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी तिचे समुपदेश केले. त्यानंतर पतीला बोलावून घेत दोघांमध्ये समझोताही करून दिल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे.
विश्वजीत व सपना (दोघांच्या नावात बदल) या दोघात ओळखीनंतर प्रेम झाले. दोघांची जात एकसारखी नसल्यामुळे कुटुंबांचा विरोध पत्कारून त्यांनी अडीच वर्षांपुर्वी विवाह केला. विश्वजीत हा बँकेत वसुलीचे तर सपना सपना खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीला करते. दोघांचा सुरळीत संसार सुरु असतानाच विश्वजीतचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्याच काळात सपनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती झाल्यानंतर पत्नीने त्यास अनेकवेळा समजावून सांगितले. मात्र, तो काही केल्या महिलेसोबतचे संबंध संपविण्यास तयार नव्हता. शेवटी पत्नीने कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी दुपारीच ती चार महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन रेल्वेस्टेशन परिसरात दाखल झाली. बाळासह रेल्वेसमोर जीव देण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये थांबलेली असतानाच त्याठिकाणी वेदांतनगरचे निरीक्षक ब्रम्हा गिरी हे गस्तीवर आले. त्यांना सपनाचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी गाडीतुन खाली उतरत तिची चौकशी सुरु केली. तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दामिनी पथकाला पाचारण केले. दागिनी पथकाच्या निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, मनिषा बनसोडे यांनी सपनाशी संवाद साधत तिचे समुपदेशन केले. त्यामुळे तिने आत्महत्येचा विचार बदलला.
पतीने दिली संबंधाची कबुली
एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची कबुली पतीने पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर निरीक्षक गिरी यांनी त्यास सर्व बंद करून पत्नी, मुलासोबत सुखी संसार करण्याच्या सुचना दिल्या. तेव्हा त्याने घडलेल्या प्रकाराची माफी मागत सुखी संसार करण्याचा शब्द पोलिसांना दिला. तेव्हा पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन करीत निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना त्यांना शुभेच्छा देत घरी पाठवले.