महिनाभरानंतर औरंगाबाद शहरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:32 AM2018-09-18T00:32:53+5:302018-09-18T00:33:19+5:30
शहरात तब्बल महिनाभरानंतर सोमवारी पाच दिवसांचे गणराय आणि ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाला पावसाने तासभर चांगलीच हजेरी लावली. प्रारंभी जोरदार आणि नंतर रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात तब्बल महिनाभरानंतर सोमवारी पाच दिवसांचे गणराय आणि ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाला पावसाने तासभर चांगलीच हजेरी लावली. प्रारंभी जोरदार आणि नंतर रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.
जिल्ह्यात १६ आॅगस्ट रोजी श्रावणसरींनी सलग १८ तास हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पाऊस गायब झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाची नुसती प्रतीक्षा करावी लागत होती. दररोज आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ येत होती. शहरात सोमवारी दुपारी आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी झाली. त्यामुळे पाऊस बरसणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. शहरवासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. शहर आणि परिसरात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अखेर पावसाचे आगमन झाले.
महिनाभर पावसाने ओढ दिल्याने नागरिकांकडून रेनकोट, छत्र्या सोबत नेण्याचे टाळण्यात येत होते. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर दुचाकीचालक, पादचाऱ्यांची धावपळ होताना पाहायला मिळाली. पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी मिळेल त्या जागेचा आडोसा घेतला जात होता. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांवर चांगलेच पाणी साचले. आकाशवाणी, त्रिमूर्ती चौक रस्ता, मोंढा नाका परिसर, कैलासनगर, अहिंसानगरसह विविध भागातील रस्त्यांवर पाणी जमा झाले. त्यामुळे अशा रस्त्यातून ये-जा करताना वाहनचालकांची तारांबळ होताना पाहायला मिळाली. पावसाअभावी शहराच्या तापमानातही वाढ झाली होती. त्यामुळे भर पावसाळ्यात उकाड्याला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत होती. पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाला.