दाभोलकर यांच्या खुनानंतर सचिन अंदुरेला पश्चात्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:57 AM2018-09-14T00:57:12+5:302018-09-14T00:57:41+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याचा सचिन अंदुरे याला पश्चात्ताप झाला होता.
औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याचा सचिन अंदुरे याला पश्चात्ताप झाला होता. त्यामुळे या खुनानंतर तो काही दिवस तणावाखाली होता. तेव्हा त्याने एका चाट भांडारवाल्याकडे त्याच्या हातून खूप मोठी चूक झाल्याची कबुली दिली होती, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) ने शरद कळसकर (रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) आणि सचिन अंदुरे (रा. कुंवारफल्ली, औरंगाबाद) यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नालासोपारा स्फोटकप्रकरणी मुंबई दहशतवादविरोधी पथकाने वैभव राऊत, सुधन्वा गोधळकर आणि शरद कळसकर यांना अटक केली होती. कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले.
१४ आॅगस्ट रोजी एटीएसने सचिनला औरंगाबादेतून उचलले. तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी त्याला औरंगपुरा भागातील सासुरवाडीत आणून सोडले आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी सीबीआयने सचिनला अटक करून मुंबईला नेले होते. अंदुरे हा शहरातील निरालाबाजार येथील एका कापड दुकानात नोकरी करायचा. त्यासोबतच तो शहरातील विविध व्यावसायिकांच्या व्यवहाराची अकाऊंटची कामे करून देत असे.
काही जणांकडे महिन्यातून एकदा तर काहींकडे तो दर आठवड्याला कामासाठी जात असे. गारखेडा परिसरातील एका चाट भांडारचालकाकडेही तो नियमित जात. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर राज्यात प्रचंड संताप व्यक्त होत होता. त्याबाबतच्या बातम्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रांतून प्रकाशित होत. शिवाय राज्यभर निषेध व्यक्त केला जात. त्यामुळे आपण एका मोठ्या व्यक्तीला संपविल्याचे सचिनला समजले होते. त्यामुळे तो तणावात होता.