मनपा प्रभारी मुंडे पाठोपाठ निलंगेकरांचाही नांदेड दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:30 AM2017-07-21T00:30:21+5:302017-07-21T00:33:30+5:30
नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती केली. त्यांचा १९ आणि २० जुलैचा नांदेड दौरा रद्द झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती केली. त्यांचा १९ आणि २० जुलैचा नांदेड दौरा रद्द झाला. त्यापाठोपाठ आता २२ रोजी होणारा कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा नांदेड दौराही रद्द झाला आहे. निलंगेकर हे भाजपाचे महापालिका निवडणूक प्रभारी आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे यांना दिल्लीत जावे लागणार असल्याने भाजपाची २२ जुलैची बैठक रद्द करण्यात आली आहे. एकूणच या दोन नेत्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा राजकीय घडामोडींना ब्रेक बसला आहे.
महापालिका निवडणूक संदर्भाने राष्ट्रवादीची भूमिका विरोधी पक्ष नेते मुंडे यांच्या दौऱ्यानंतर तर भाजपाची भूमिका २२ जुलैच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार होती. एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागवले जात आहेत.
सत्ताधारी भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भाजपाकडून इच्छुकांनी नेलेल्या अर्जांची संख्या काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने आज घडीला कमी आहे. राष्ट्रवादीचीही परिस्थिती तीच आहे. काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत एक सभा घेतली आहे. अन्य पक्ष मात्र आपल्या प्रभारीकडे नजरा खिळवून बसले आहेत. त्यांच्या आदेशानंतरच महापालिका निवडणुकीची रणनीती स्पष्ट होणार असल्याचे सांगत आहेत.