औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही कचरा संकलनाचे काम सुरू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:17 PM2018-12-01T17:17:29+5:302018-12-01T17:23:00+5:30
आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद : संपूर्ण शहरात कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचे प्रायोगिक तत्त्वावरील ३ वॉर्डांमध्ये १ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कामाचा मुहूर्त चुकला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरातील नऊ झोनमध्ये खाजगीकरणाद्वारेच कचरा उचलण्यात येतो. प्रत्येक कामासाठी वेगळा कंत्राटदार मनपाने नेमला आहे. दरवर्षी कचरा उचलण्यासाठी मनपा तब्बल ६० कोटी रुपये खर्च करीत आहे. या खर्चात बचत व्हावी म्हणून आयुक्तांनी शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. वर्क आॅर्डर मिळाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत कंपनीने पूर्ण ताकदीने काम सुरू करावे, असे मनपाला अपेक्षित आहे.
मागील दोन महिन्यांत कंपनीने शहरात कोणतीच यंत्रणा उभी केलेली नाही. प्रायोगिक तत्त्वावर झोन ३, ५ आणि ६ मध्ये काम सुरू करावे, असे आयुक्तांनी १६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या तिन्ही वॉर्डातील खाजगी वाहने, खाजगी कर्मचारी यांचे काम १ डिसेंबरपासून बंद करावे, असेही नमूद केले आहे. दरम्यान शहराची फारशी माहिती नसलेल्या कंपनीने स्थानिक पाठबळ मिळविण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू केले आहे.
कचरा टाकणार कोठे?
महापालिकेने शहरातील सर्व कचरा संकलनाची जबाबदारी बंगळुरू येथील कंपनीला दिली असली तरी कंपनीने जमा केलेला कचरा चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी येथे नेऊन टाकावा, असे सूचीत केले आहे. या चारही ठिकाणी मनपा भविष्यात कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आणखी किमान ६ महिने लागणार आहेत. सध्या चारही ठिकाणी कचऱ्याचे डोंगर रचण्यात येत आहेत.