रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची घाटीतील डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:15 AM2017-11-13T00:15:16+5:302017-11-13T00:15:26+5:30
घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी डॉक्टरने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर नातेवाईकांनी डॉक्टरांविषयी रोष व्यक्त केल्याने गोंधळ निर्माण झाला.
राजेश पंडित गडवे (२१, रा. कानगाव, ता. कन्नड), असे मयत रुग्णाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी १ नोव्हेंबरला घाटीत आणले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून औषधी देऊन घरी पाठवून दिले. ३ नोव्हेंबरला तो पुन्हा आला. पुन्हा उपचार घेऊन तो परतला. मात्र, ११ नोव्हेंबरला प्रकृती अधिक बिघडल्याने राजेशला सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास घाटीच्या मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ मध्ये दाखल करण्यात आले. रात्री ३ वाजेच्या सुमारास त्याला सोनोग्राफीची आवश्यकता होती. त्याचा त्रास वाढल्याने डॉक्टर स्वत: त्याला सोनोग्राफीसाठी घेऊन गेले.
सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा त्रास वाढला होता. निवासी डॉक्टर आकाश सिंग यांनी त्यास जीवनरक्षकप्रणाली तातडीने उपलब्ध करून लावली; परंतु १२.३0 वाजेच्या सुमारास तो दगावला. त्यावेळी आलेल्या मामाने डॉ. आकाश सिंग यांना मारहाण केली. यावेळी डॉक्टर आणि सुरक्षारक्षक, इतर कर्मचारीवर्ग मदतीला तात्काळ धावला.