रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरांविरूद्ध तक्रार
By Admin | Published: February 16, 2016 11:41 PM2016-02-16T23:41:31+5:302016-02-16T23:43:56+5:30
परभणी : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाकडे दाखल केली आहे़
परभणी : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाकडे दाखल केली आहे़
तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील लक्ष्मण शंकर गमे (वय २५) यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ मात्र वेळेत त्यांना उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुपारी मृत्यू झाला़ या प्रकारानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरूद्ध शंकर गमे यांनी पोलिस प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार अर्ज दिला आहे़
परंतु, या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ या तक्रारीनुसार लक्ष्मण गमे यांना सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात आणले़ परंतु, त्यांना त्या ठिकाणी उपचार झाले नाहीत़ अपघात विभागातून हाडांच्या विभागात जाण्याचा सल्ला देण्यात आला़ तेथेही वेळेत उपचार मिळाले नाहीत़ अखेर त्याच ठिकाणी रुग्ण खाली कोसळला़ त्यानंतर त्यांना परत अपघात विभागात दाखल करण्यात आले़ परंतु, दुपारी हा रुग्ण दगावला़ या सर्व प्रकारानंतर शंकर गमे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे़ डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे़
दरम्यान, या तक्रार अर्जासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जावेद अथर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ परंतु, संपर्क न झाल्याने या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही़ (प्रतिनिधी)