धुळवड खेळून गोदावरी नदीपात्रात उतरला पण परत आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 11:40 AM2022-03-19T11:40:27+5:302022-03-19T11:41:30+5:30
रंग खेळल्यानंतर दुपारच्या वेळेत स्नानासाठी नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
पैठण ( औरंगाबाद ) : पैठण शहरातील गोदावरी नदीवरील पाटेगाव पुलाजवळ नदीपात्रात बुडून पाटेगाव येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
अंकुश रंभाजी ससाणे ( ५०) राहणार पाटेगाव, ता. पैठण, असे बुडालेल्या मयत इसमाचे नाव आहे. रंग खेळल्यानंतर दुपारच्या वेळेत स्नानासाठी नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ससाणे बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी चार तास शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला.
अंकुश ससाणे पाण्यात बुडाल्याची बातमी पाटेगाव परिसरात पसरल्याने नदीपात्रात स्थानिक युवकांनी उड्या मारून त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यात यश आले नाही. पाटेगावचे पोलीस पाटील व सरपंच गोकूळ रावस यांनी या बाबत पैठण पोलिसांना खबर दिली.
पोलीस निरीक्षक किशोर पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती लक्षात घेता औरंगाबाद येथील अग्नीशमन गाडी सह जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तास शोध मोहीम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेमुळे पाटेगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.