नमाज पढल्यानंतर पोहोण्यासाठी गेले अन् दोघेही बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:04 AM2021-04-05T04:04:12+5:302021-04-05T04:04:12+5:30
औरंगाबाद : गांधेली येथील नवीन मशिदीमध्ये नमाज अदा केल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांना वाटेत तलाव पाहून पोहोण्याचा मोह अनावर ...
औरंगाबाद : गांधेली येथील नवीन मशिदीमध्ये नमाज अदा केल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांना वाटेत तलाव पाहून पोहोण्याचा मोह अनावर झाला. दोघांनी पाण्यात उड्या मारल्या; परंतु ते नंतर वरती आलेच नाहीत. चिकलठाणा पोलिसांनी स्थनिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढून घाटीत रवाना केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गांधेली शिवारातील तलावात घडली.
अतीक अकिल शेख (१९) आणि नदीम नासेर शेख (१७, दोघेही रा. नुरानी मशिदजवळ, गारखेडा) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघे रविवारी दुपारी परिसरातील आठ ते दहा मित्रांसह गांधेली शिवारातील बाबूभाई यांच्या शेतात जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते सर्वजण दुपारी २ वाजेच्या सुमारास गांधेली गावात आले. तेथे बांधकाम सुरू असलेल्या मशिदीमध्ये सर्वांनी दुपारची नमाज अदा केली. तेव्हा अतिक व नदी हे दोघेजण घराकडे जातो म्हणून दुचाकीवर पुढे निघाले. नवीन बीड बायपास रोडलगत असलेला तलाव पाहून दोघांनी पोहोण्याचा बेत रचला. तलावाच्या काठावर कपडे ठेवून त्यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही तलावात बुडाले.
मागे राहिलेला तरुणांचा घोळका घराकडे निघाला तेव्हा त्यांना तलावाच्या काठावर अतिक व नदीम या दोघांची कपडे दिसले. त्यांनी तलावाजवळ येऊन पाहिले, तर आत कोणीच दिसत नव्हते. त्यापैकी काहीजणांनी पाण्यात उडी मारून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते दिसून आले नाही. त्यामुळे ते घाबरले व तरुणांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा स्थानिक नागरिक जमा झाले. काही नागरिकांनी ही घटना चिकलठाणा पोलिसांना कळविली. लागलीच सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना बेशुद्धावस्थेत दोघांना बाहेर काढले व घाटीत दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
चौकट....
गरिबी कुटुंबातील दोघेही
मयत अतिक व नदीम या दोघांचीही कौटुंबिक परिस्थिती बेताचीच आहे. अतीकचे वडील ट्रॅक्टर चालवतात, तर नदीमचे वडील हे बोअरिंग मशीनच्या वाहनांवर मजुरी काम करतात. या घटनेमुळे गारखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक फौजदार लुटे हे तपास करीत आहेत.