खोळंब्यानंतर तूर खरेदी केंद्रे सुरळीत
By Admin | Published: May 11, 2017 11:27 PM2017-05-11T23:27:38+5:302017-05-11T23:32:34+5:30
बीड : गत महिन्यातील १५ दिवसांच्या खोळंब्यानंतर जिल्ह्यातील दहाही खरेदी केंद्रे सुरळीत सुरू झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गत महिन्यातील १५ दिवसांच्या खोळंब्यानंतर जिल्ह्यातील दहाही खरेदी केंद्रे सुरळीत सुरू झाली आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतर खरेदी केंद्रावर तूर घेण्यास सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर्तास साठा झालेल्या तुरीचीच खरेदी होत आहे.
मध्यंतरी तूर खरेदी केंद्रे बंद केल्याने जिल्ह्यातील १० ठिकाणच्या केंद्रांवर सुमारे १ लाख क्विंटल तूर पडून होती. अवकाळी पाऊस, ऊन यामुळे तुरीचे नुकसान झाले असले तरी सद्य:स्थितीला मोजमाप होत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या आदेशानंतरही गेवराई, शिरूर, बीड, कडा कृउबाकडे बारदाणा उपलब्ध नसल्याने मालाची खरेदी करणे अवघड झाले होते.
नाफेडकडून गत आठवड्यात बारदाणा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय, साठवणुकीकरिता जागेचा प्रश्नही मिटला असल्याने कृउबावर ठरवून दिेलेल्या वजनकाट्यातून खरेदी होत आहे. ३१ मेपर्यंत खरेदी केंद्रे सुरू राहणार असून, सुरूवातीच्या काळात साठा झालेली तूर घेतली जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर शेतकऱ्यांकडील शिल्लक तूरही घेतली जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती एस.के. पांडव म्हणाल्या.
अद्यापही जवळपास ६० हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीचा साठा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.
खरेदी केंद्रावरील किचकट प्रक्रियेला वैतागून शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडे तूर विकत आहे. त्यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांचीच चांदी होणार असल्याचे दिसून येत आहे.