पाऊस लांबल्याने जनावरांनी धरली पुन्हा चारा छावण्यांची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:42 PM2019-07-18T14:42:14+5:302019-07-18T14:47:33+5:30
मराठवाड्यात ३८ हजार जनावरे छावणीतील दावणीला
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या महिन्यात चारा छावण्या आणि जनावरांची संख्या कमी झाल्यानंतर जुलै मध्यानंतर छावण्या आणि जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ८ जुलैपर्यंत मराठवाड्यात ३८ चारा छावण्या सुरू होत्या, आता तो आकडा ५४ वर गेला आहे. ८ जुलै रोजी छावण्यांमध्ये २५ हजार जनावरे होती. सद्य:स्थितीमध्ये ३८ हजार जनावरे छावणीमध्ये आहेत. एका आठवड्यात १३ हजार जनावरे छावणीमध्ये पुन्हा दाखल होण्यामागे पाऊस लांबल्याचे कारण आहे.
विभागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. विभागात झालेल्या कमी-अधिक पावसामुळे छावण्यांतील जनावरे शेतकऱ्यांनी पुन्हा दावणीला बांधली आहेत. मे अखेरपर्यंत विभागातील छावण्यांमध्ये पाच लाखांच्या आसपास जनावरे छावण्यांमध्ये होती. २९ जून रोजी या छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे छावण्यांतील जनावरांची संख्या घटली. ८ जुलै रोजी औरंगाबाद, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यातील ३८ चारा छावण्यांमध्ये २३ हजार ४७६ लहान, तर १ हजार ८१५ मोठे, अशी एकूण २५ हजार २९१ जनावरे होती. आता सर्व मिळून ३७ हजार ८१९ जनावरे आहेत. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. पूर्व मान्सूनच्या हजेरीने काही विभागात चाऱ्याची व्यवस्था झाली. जूनच्या मध्यानंतर बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर बहुतांश छावण्या बंद झाल्या. जालना जिल्ह्यातील सर्व चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.
८ जुलै २०१९ रोजी सुरू असलेल्या चारा छावण्या
जिल्हा छावण्या जनावरे
औरंगाबाद १ २३१५
परभणी १ ४९२
बीड १२ ७३३२
उस्मानाबाद २४ १५१५२
एकूण ३८ २५२९१
१७ जुलै रोजी सुरू असलेल्या चारा छावण्या
जिल्हा छावण्या जनावरे
औरंगाबाद १ २४२१
परभणी १ २२३
बीड ११ ८३३७
उस्मानाबाद ४१ २६८३८
एकूण ५४ ३७८१९