राजीनाम्यानंतरही सेनेत शांतताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:04 AM2017-08-18T00:04:38+5:302017-08-18T00:04:38+5:30
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे नांदेडमध्ये सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या पक्षांनीही अद्याप आपले पत्ते उघड केले नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची चर्चा मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. भाजपाने दहा नगरसेवकांना आपल्याकडे खेचून घेत पक्षाचे दरवाजे उघडले आहेत. आणखीही काही नावे पुढे येत आहेत. त्याचवेळी आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या शिवसेनेला नांदेडमध्ये मोठी घरघर लागल्याचेच दिसत आहे. जिल्हा प्रमुख, महानगराध्यक्ष यांच्यासह चार नगरसेवकांनी पक्ष त्याग करीत जाहीररित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व उलथापालथीत शिवसेनेचे स्थानिक आमदार हेमंत पाटील यांच्यावरच जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे, माजी विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांनी व तसेच अन्य तीन नगरसेवकांनीही आरोप केले आहेत. नांदेडमध्ये शिवसैनिकांना न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. आ. पाटील हे कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सेनेतील यासर्व घडामोडीबाबत पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली होती़ मात्र त्याची दखल घेतली नाही़ काँग्रेसच्या इशाºयावरच सेना काम करीत असल्याचे आरोपही झाले. पदाधिकारी व नगरसेवकांनी सेनेच्या आमदारावर केलेले आरोप तसेच पक्ष सोडणाºयांबाबत कोणतीही प्रतिक्रिया ना आमदार हेमंत पाटील यांनी दिली ना कोणत्या अन्य पदाधिकाºयांनी दिली. पक्ष सोडणाºयांना सेनेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागते. हा सेनेचा इतिहास आहे. नांदेड मात्र त्यास अपवाद ठरले आहे. त्यानंतर सेनेचे नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांच्या बैठका, धावते मेळावे घेण्यात आले होते. या मेळाव्यातही अप्रत्यक्षरित्या पक्षांतरांची चर्चा घडवून आणणाºयांना धडा शिकवण्याची सुतोवाच नेत्यांसह स्थानिक आमदारांनी केले होती. मात्र प्रत्यक्षात जिल्हा प्रमुखांसह नगरसेवकांनी राजीनामे सादर केले आणि भाजपात प्रवेशही घेतला. मात्र या सर्व घडामोडीनंतरही कोणतीही प्रतिक्रिया अद्याप उमटली नाही. असाच प्रकार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाबतीतही घडला आहे.