निवृत्तीनंतरही आरोग्यसेविकांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 10:27 PM2018-12-07T22:27:20+5:302018-12-07T22:27:37+5:30
आता जवळपास १७ आरोग्यसेविका सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी आज शुक्रवारी आरोग्य विभागात जाऊन निवडश्रेणीची मागणी केली. मात्र, गोपनीय अहवाल घेऊन या, मग बघू, असे म्हणत त्यांची बोळवण केली.
औरंगाबाद : सलग २४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर आरोग्यसेविकांनी निवडश्रेणी मिळण्यासाठी मागणी केली; पण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वेळकाढूपणाची भूमिका घेतली. आता जवळपास १७ आरोग्यसेविका सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी आज शुक्रवारी आरोग्य विभागात जाऊन निवडश्रेणीची मागणी केली. मात्र, गोपनीय अहवाल घेऊन या, मग बघू, असे म्हणत त्यांची बोळवण केली.
तथापि, जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस यांच्या नेतृत्वाखाली या १७ आरोग्यसेविकांनी मुुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची भेट घेतली व त्यांना आपबिती कथन केली. आज जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी कार्यालयीन अधीक्षक महाजन यांच्याकडे पाठविले. महाजन यांनी तुमचे गोपनीय अहवाल या कार्यालयात नसल्यामुळे २४ वर्षांची निवडश्रेणी देता येत नाही. तुम्ही ज्या-ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कामे केलेली असतील, तेथे जाऊन गोपनीय अहवाल घेऊन येण्यास सांगितले.
कार्यालयीन अधीक्षकांचा हा सल्ला ऐकून जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, आरोग्यसेविका व सुपरवायझर एस. जे. जाधव, के. एम. काळे, जे. एम. टाकळकर, जी. एस. हंसारे, आगाशे, आडसूळ, चोपडे, कट्टे, कसबे, गुणावत, पळशीकर, बोरडे आदी जण अवाक् झाले. आरोग्यसेविकांनी ज्या- ज्या ठिकाणी सेवा दिली, त्यावेळचे वैद्यकीय अधिकारी बदलून गेले आहेत. त्या आरोग्य केंद्रात आता नवीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तेव्हाचे गोपनीय अहवाल ते कसे देतील. कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल संकलित करण्याचे अधिकार हे मुख्यालयाचे आहेत. असे असताना सेवानिवृत्तीनंतर या आरोग्यसेविकांना गोपनीय अहवाल आणण्यासाठी आरोग्य केंद्रात पाठविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न वयोवृद्ध आरोग्यसेविकांनी उपस्थित केला आहे.
‘सीईओ’ म्हणाले आठ दिवसांत देऊ
जि. प. आरोग्य विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकांनी गोपनीय अहवाल आणण्याची सूचना ऐकून हतबल झालेल्या आरोग्यसेविकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली. तेव्हा कौर यांनी तुम्ही काळजी करू नका, मी आठ दिवसांत तुम्हाला निवडश्रेणीचे आदेश देते, असे आश्वासन दिले.