शिवसेनेने कचरा टाकल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ९९ मिनिटांत स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:00 AM2018-07-20T11:00:57+5:302018-07-20T11:07:25+5:30
शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन गाड्या कचरा टाकताच हबकलेल्या प्रशासनाने परिसराच्या स्वच्छतेसाठी विक्रमी वेळेची नोंद केली.
औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन गाड्या कचरा टाकताच हबकलेल्या प्रशासनाने परिसराच्या स्वच्छतेसाठी विक्रमी वेळेची नोंद केली. अवघ्या १ तास ३९ मिनिटांत सर्व परिसर स्वच्छ झाला. यासाठी दोन जेसीबी, चार-पाच टिप्पर, २५ पेक्षा अधिक कर्मचारी कामाला लावले. रोगराई पसरू नये, दुर्गंधी येऊ नये, यासाठी कीटकनाशकासह धूर, सुगंधी द्रव्याची फवारणीही जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.
शहरातील कचराकोंडीवर १५३ दिवसांपासून तोडगा निघत नाही. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकण्याचे आंदोलन करण्याचे सेनेने ठरविले व पदाधिकारी, कार्यकर्ते गुरुवारी सकाळी ११.१० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सुरुवातीला घोषणाबाजी सुरू केली. यानंतर ११.३० वाजता कचऱ्याने भरलेला हायवा ट्रक आला. त्या ट्रकमधील कचरा प्रवेशद्वारावर टाकला. या हायवाच्या पाठीमागे असलेल्या टिप्परमधून ११.३५ वाजता कचरा टाकण्यात आला. त्यानंतर पुन्हा ११.५५ वाजता कचऱ्याने भरलेला ट्रॅक्टर आला. तो कचराही टाकण्यात आला.
हा सर्व प्रकार घडत असतानाच पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत होता. शिवसेनेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्व कर्मचारी बाहेर आले होते. बघ्यांची गर्दी झाली होती. तीन वाहने भरून कचरा टाकल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांनाही नाकाला रुमाल लावावे लागले. टाकलेला कचरा उचलण्यासाठीची यंत्रणा त्याच वेळी तत्पर झाली.
कचरा टाकल्यानंतर अवघ्या २७ व्या मिनिटाला म्हणजेच १२.२२ वाजता कचरा उलण्यासाठी पहिला जेसीबी आला. सोबत २५ पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी दाखल झाले. कचरा घेऊन जाण्यासाठी चार-पाच टिप्परही आले. १२.४० वाजता जेसीबीद्वारे कचरा उचलण्यास सुरुवात झाली. अवघ्या २९ मिनिटांत सर्व कचरा जेबीसीद्वारे उचलून टिप्परमध्ये भरण्यात आला. दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी परिसर स्वच्छ झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधी येऊ नये म्हणून सुगंधी डीओ मारण्यात आला. तर डास, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी परिसरात धूरफवारणी करून डीडी पावडर टाकण्यात आली.
नाक बांधून कामकाज
तीन गाड्या भरून कचरा टाकल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड दुर्गंधी येत होती. परिसरात उभे राहणेही कठीण झाले होते. कार्यालयीन कर्मचारी, अधिकाऱ्यांना नाकाला रुमाल बांधून कामकाज करावे लागले. कचरा टाकल्यापासून अवघ्या दहा मिनिटांच्या आत जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सुगंधी अत्तर शिंपडण्यात आले.
स्वच्छ पाण्याने धुतला परिसर
हा कचरा उचलल्यानंतर फायरब्रिगेडच्या गाडीला पाचारण करून परिसर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
शहर स्वच्छतेसाठी अशीच तत्परता दाखवा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकलेला कचरा अवघ्या १ तास ३९ मिनिटांमध्ये उचलून परिसर स्वच्छ केला, मात्र मागील १५३ दिवसांपासून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असताना प्रशासन शांत आहे. मात्र अधिकाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होताच प्रशासन तत्पर झाल्याची कुजबूज तेथे सुरू होती.