१० वर्षे झाली तरीही भरतीचा घोळ संपेना
By Admin | Published: June 11, 2014 12:42 AM2014-06-11T00:42:08+5:302014-06-11T00:52:43+5:30
औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय.
औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय. २००३-०४ मध्ये पालिकेने १९९० पासून दैनंदिन वेतनावर असलेले कर्मचारी शासनादेशाने सेवेत कायम केले. त्यामध्ये अनेक अफरातफरी करीत कमी वयाचे, बोगस नावाचे कर्मचारी भरती करून घेण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत कायम होऊन १० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा विचार सुरू
आहे.
२००३ ते २०१४ या काळात ६ आयुक्त पालिकेत आले आणि गेले; मात्र कुणीही ११२४ नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका देण्यासाठी पाऊल उचलले नाही. त्यामागील कारण म्हणजे नोकरभरतीवरून २००७ पासून विधिमंडळात झालेला गाजावाजा होय.
शासन आदेशावरून भरतीची चौकशी झाल्यामुळे २० कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आले.
१२३ कर्मचाऱ्यांच्या बनावट टी.सी. समोर आल्या. १०२ कर्मचाऱ्यांकडे पहिल्या वेतनाची पावती नाही. ५५ जणांना शासनमान्यता नाही. १६८ कर्मचारी आरक्षणात बसत नाहीत. ४८१ जणांना सेवापट न देण्याचा अहवाल शासन आदेशाने नेमलेल्या समितीने पुढे आणला.
कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांसाठी कामगार संघटनांनी आंदोलने केली, तर ती नोकरभरती बेकायदेशीर आहे, त्याची चौकशी व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने
केली.