ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच ‘भाई-दादा’ गिरीवर निर्णय
By Admin | Published: April 23, 2016 01:11 AM2016-04-23T01:11:16+5:302016-04-23T01:22:15+5:30
औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत.
औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. त्या दौऱ्यानंतरच सेनेतील ‘भाई-दादा’गिरीचे राजकारण संपुष्टात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सभागृह नेता राजेंद्र जंजाळ आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात हात-पाय तोडण्याची भाषा दोन दिवसांपासून सुरू आहे. दोघांच्या कृतीचे समर्थन करण्यात अर्थ नाही. कोण बरोबर, कोण चूक हे तपासणे अवघड होऊन बसले आहे. परंतु खैरेंकडून असे होणे अपेक्षित नव्हते. हे प्रकरण खालच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. हात-पाय तोडण्याची भाषा पक्षचौकटीच्या बाहेरची आहे, असे एका मुंबईतील नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितले.
पक्षात पहिल्यांदाच अशा बेशिस्तीने कळस गाठलेला नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाच पालकमंत्री रामदास कदम विरुद्ध खैरे आणि आता त्यात सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांची भर पडल्यामुळे सेनेतील राजकारण ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी अशा पद्धतीने अधिकारशाहीसाठी भांडत असतील तर खालच्या पातळीवरील पदाधिकारी कोणत्या थरावर असतील, यावरून शिवसेनेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर शिवजलक्रांती मोहिमेच्या अनुषंगाने बैठक घेतली. २ ते १२ मेदरम्यान कधीही ठाकरेंचा मराठवाडा दौरा निश्चित होईल. लातूरपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. दौऱ्यानंतर सेनेतील दुफळीचा शेवट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
संपर्कप्रमुख म्हणाले.....
संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, खैरे विरुद्ध जंजाळ हे प्रकरण मातोश्रीवर गांभीर्याने घेतले गेले आहे. पक्षप्रमुखच या प्रकरणात निर्णय घेतील. माझ्या पातळीवरचा हा विषय नाही.