पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे
By बापू सोळुंके | Published: May 5, 2023 04:01 PM2023-05-05T16:01:00+5:302023-05-05T16:02:13+5:30
मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने १ मे पासून क्रांतीचौकात सुरू असलेले ठिय्या आंदोलन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या आश्वासनानंतस मागे घेण्यात आले. आंदोलकांच्या मागणीनुसार मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक लावली जाईल, असे आश्वासन यावेळी भुमरे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे. मराठा आणि कुणबी मराठा एकच असल्याने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून प्रमाणपत्र देण्यात यावे, यामागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात १ मे पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उन, पावसात सुरू असलेल्या या आंदोलना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सचीन आहिर यांनी भेटी दिल्या होत्या. ही बाब समजल्यानंतर शुक्रवारी दुपारी पालकमंत्री संदीपान भुमरे , शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह क्रांतीचौकात जाऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.
यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यावेळी आंदोलकांच्या मागणीनुसार भुमरे यांनी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण विषयावर तातडीने बैठक लावण्याची मागणी करणारे पत्र पाठवले. या पत्राची एक प्रत आंदोलकांना दिले. पालकमंत्र्यांनी प्रमाणिक प्रयत्न केल्याने हे आंदोलन मागे घेण्याचा आणि सायंकाळी आत्मदहन करण्याचा दिलेला इशाराही मागे घेतल्याचे यावेळी जाहिर केले. या आंदोलनात प्रा.चंद्रकात भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, दिव्या पाटील, रेखा वाहटुळे, ॲड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले,डॉ. शिवानंद भानुसे, प्रा.भाऊसाहेब शिंदे, शिवाजी भिंगारे, रविंद्र वाहटुळे, पंढरीनाथ काकडे, राम लघाने, साईनाथ कोसोळे, आशिष औताडे, सुनील औताडे, बी.एस.खोसे, कैलास गोर, अशोक मोरे, रमेश गायकवाड, शिवम भराट, कृष्णा भराट,प्रसाद भागिले आदींची सहभाग होता.