एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:28 IST2025-03-01T12:28:03+5:302025-03-01T12:28:17+5:30
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक बदलले, गुन्हेही दाखल होणार

एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार
छत्रपती संभाजीनगर : ओव्हर परिसरातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील सामूहिक कॉपी प्रकरणानंतर परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याशिवाय केंद्रातील संचालक, पर्यवेक्षकांसह संपूर्ण स्टाफही बदलला आहे तसेच संचालक, पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाच्या पेपरला केंद्राला तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि.२७) भेट दिली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. त्याविषयीचा सविस्तर अहवाल तहसीलदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे व विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे यांना वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार सदर केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला, सामूहिक कॉपी आहे किंवा कसे याबाबत विभागीय मंडळाला पत्र देण्यात आले तसेच केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करून इतरांच्या नियुक्त्या केल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.
हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार
केंद्र संचालक जी.जे. जाधव यांनी परीक्षा संचलनात कर्तव्यात कसूर केली. नियमानुसार परीक्षा संचालन केले नाही. अभिलेखे अद्ययावत ठेवले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्याशिवाय एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी होते. त्या हॉलवरील सर्व पाच पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्यामध्ये व्ही. यु. वैद्य, पी. जी. गवळी, पी. बी. महाडिक, सय्यद सरवर, वाय. एम. राठोड यांचा समावेश असल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.
यांची झाली नेमणूक
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर संचालक म्हणून शेख फईम यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय पर्यवेक्षक म्हणून अण्णा शेजूळ, पांडुरंग जाधव, नवनाथ मंत्री, चंद्रकांत चव्हाण, सपना ठाकरे, गजानन पालवे, नितीन देशमुख, विद्या सोनगिरे, एम. डी. राठोड, काळेश्वर भुरे, ज्ञानेश्वर कौशल्ये, जावेद अन्सारी आणि मुनवर शेख यांची नियुक्तीचे आदेश शिक्षणाधिकारी लाठकर यांनी काढले.
संस्थाचालकाच्या नातेवाईकाची धावाधाव
संस्थाचालकाचा एक नातेवाईक शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संबंधित नातेवाईकाने जि. प. च्या शिक्षण विभागात शुक्रवारी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यासाठी फोनाफोनी करण्यात येत होती. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा अहवाल अनुकूल करण्यासाठीही प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, जि.प.चे सीईओ विकास मिना यांनी तहसीलदारांच्या अहवालावरून संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्यामुळे सायंकाळच्या वेळी सूत्रे हलली आणि कारवाईची घोषणा करण्यात आली.
इथेही तोच न्याय लावणार का?
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण, वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील परीक्षा केंद्रात गडबड समोर आल्यानंतर संबंधित शाळेच्या संस्थाध्यक्ष व सचिवांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्याचवेळी राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल होणार का, अशीही चर्चा शिक्षण वर्तुळात करण्यात येत आहे.