महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:01 PM2022-06-24T17:01:45+5:302022-06-24T17:02:51+5:30
१९९० च्या दशकापासून जैस्वाल शिवसेनेत आहेत. महापौर, खासदार, आमदार अशी पदे जैस्वाल यांनी तीन दशकांत शिवसेनेकडून मिळाली.
औरंगाबाद: मध्य मतदारसंघाचे आ. प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेसोबत बंडखोरी का केली, यामागे मुख्य कारण म्हणजे, ‘मातोश्री’वर वारंवार भेटण्याची विनंती करूनही टाळले जात असल्यामुळेच वैतागून त्यांनी आ. शिरसाट यांच्यासोबत शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
१९९० च्या दशकापासून जैस्वाल शिवसेनेत आहेत. महापौर, खासदार, आमदार अशी पदे जैस्वाल यांनी तीन दशकांत शिवसेनेकडून मिळाली. १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाची भाषा केली. त्यानंतर २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून लढले मात्र त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करत मध्य मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत विजय मिळविला. २०१४ मध्ये शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजप आणि शिवसेना युती तुटल्याने मध्य मतदारसंघात पराभव झाला. २०१९ मध्ये अतिशय शेवटच्या क्षणी जैस्वाल यांना पक्षाने संधी दिली. शेवटची संधी म्हणून पक्षाकडे विनवणी केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली.
मागील अडीच वर्षांच्या काळात मतदारसंघातील कामांव्यतिरिक्त ते संघटनेच्या कामातून जरा अलिप्तच राहिले. स्थानिक पातळीवर संघटनेत काही चालत नसल्याने त्यांनी स्वत:ला अलिप्त केले होते. त्यामुळे पक्षाकडे खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांनी वारंवार वेळ मागितला, परंतु तो न मिळाल्यामुळे स्वत:सह कुटुंबीयांचे राजकीय भवितव्य पणाला लावत ते शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे.