रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:11 PM2022-10-18T15:11:51+5:302022-10-18T15:12:27+5:30
विभाग नियंत्रक कार्यालयानंतर आता सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादहून विजेवर रेल्वे धावणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेबरोबर ‘ एस.टी. ’चे ही जणू विद्युतीकरण होणार आहे. एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला जवळपास १०६ ई-बस देण्याचे नियोजन सुरू आहे.
आजघडीला विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारातील ‘ एस.टी.’ च्या चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता सिडको बसस्थानकाच्या जागेतही चार्जिंग स्टेशन साकारण्यात येणार आहे. डिझेल ऐवजी विजेवर चालणारी ‘ लालपरी ’ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. डिझेलची सतत होणारी दरवाढ आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चामुळे एस.टी. महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या वर्धापन दिनी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली. एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागातही लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. त्यासाठी भाग्यनगर परिसरातील ‘एस.टी.’ च्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. औरंगाबादला जवळपास १०६ ई-बस मिळणार असून, या बसेस कोणकोणत्या मार्गावर धावतील, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असल्याचे एस.टी. महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन बैठक झाली. त्यात ‘ एमटीडीसी ’ च्या अधिकाऱ्यांनी एमटीडीसीकडून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर प्रकाश टाकत अजिंठा येथे पर्यावरणपूरक बससेवा चालविण्याचे आश्वासन दिले. सोयगाव आगारात आणि लेणी ते फर्दापूर टी पॉइंट मार्गावरही चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.
चार्जिंग स्टेशन प्रस्तावित
सिडको बसस्थानकातही चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे. अजिंठा लेणीसाठी सध्या डिझेल बस चालविण्यात येत आहे. येथे ई-बस चालविण्याची मागणी आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक
-जिल्ह्यात सध्या एस.टी. बस-५३६
-चार्जिंग स्टेशनवर एकाचवेळी १० बसच्या चार्जिंगची व्यवस्था.
- दीड तासांत एक बसची चार्जिंग पूर्ण.
- एकदा चार्ज केल्यानंतर ई-बस धावेल ३०० किमी.