शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:22 PM2023-02-23T12:22:04+5:302023-02-23T12:22:27+5:30
नैराश्य, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पती-पत्नीचे टोकाचे पाऊल
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड ( औरंगाबाद) : आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील धावडा येथे घडली. या घटनेने गाव सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. इतके टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत.
सुरेखा संतोष दळवी ( ४१) व संतोष किसन दळवी ( ४५ दोघे रा.धावडा) असे मृत पती- पत्नीचे नाव आहे. सुरेखाने दोन दिवसांपूर्वी २० फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. १८ मध्ये विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.
कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल
या कुटुंबांवर बँकेचे व बचत गटाचे कर्ज होते. तिन एकर शेती. मार्च महिना जवळ आला. शेती मालाला भाव नाही. अशात कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. या नैराश्यातून त्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
मुल झाली पोरकी
मयत पती- पत्नी पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीच लग्न झालेले आहे. त्यांच्या आत्महत्येने ही मुल पोरकी झाली असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. या कुटुंबाला आधाराची गरज असून यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
अद्याप कारण स्पष्ट झाले नाही
दोघा पती पत्नीने आत्महत्या केली आहे मात्र त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पोलीस या घटनेचा तपास करत आहे.त्यांच्यावर कर्ज होते नैराश्य व आर्थिक विवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती आहे तपासाअंती काय ते कळेल.
- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.