तीन दिवस शोध घेतल्यानंतर राजेंद्र जैन लागला पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:41 PM2019-07-05T13:41:09+5:302019-07-05T13:45:06+5:30
विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती राजेंद्र जैन याला मिळाली होती.
औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोने चोरीतील प्रमुख आरोपी राजेंद्र जैन याला पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तब्बल तीन दिवस निराला बाजारातील त्याच्या घरासह परिसरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि रुग्णालयांची तपासणी करावी लागली. शेवटी एका नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो सापडला.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मालकाचा विश्वासघात करून व्यवस्थापक राणे याने ५८ किलो सोने चोरून जैन कुटुंबाला दिले. आरोपी अंकुर राणे हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मूळ रहिवासी आहे. तो कृषी पदवीधर असून, मागील पंधरा वर्षांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्सकडे नोकरीला आहे. तो औरंगाबादच्या शाखेत नऊ वर्षांपासून कार्यरत असून, सन्मित्र कॉलनीत भाड्याने राहतो. आरोपी राजेंद्र जैन हा निराला बाजारातील बालाजी अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याने राहतो. तेथेच तो साडी विक्रीचा व्यवसाय करतो, असे दाखवितो. आरोपी लोकेश हा बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी
या प्रकरणात विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती राजेंद्र जैन याला मिळाली होती. यामुळे अटक टाळण्यासाठी राजेंद्र हा घरी राहतच नव्हता. मात्र त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन निराला बाजार येत होते. यामुळे पोलीस त्याचा शोध निराला बाजार परिसरातच घेत होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी निराला बाजार येथील सर्व हॉटेल, लॉज आणि रुग्णालयातही शोध घेतला; परंतु तेथे राजेंद्र सापडला नाही. राजेंद्रने निराला बाजारातच फ्लॅट खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी रात्री त्याच्या फ्लॅटबाहेर साध्या वेशात पहारा दिला. तो बाहेर येताच त्याला पकडले. तर आरोपी अंकुर आणि लोकेशला तत्पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
फ्लॅटमधून बाहेर पडताना घ्यायचा काळजी
आरोपी राजेंद्र हा फ्लॅटमधून बाहेर पडताना पोलीस नसल्याची खात्री करीत होता. तो त्याची पत्नी आणि नातेवाईकांना त्याच्या घराच्या परिसरात बाहेर पोलीस दिसतात का, हे पाहण्यास पाठवीत असे. पोलीस नसल्याची खात्री झाल्यानंतरच तो फ्लॅटमधून बाहेर येई.