तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

By मुजीब देवणीकर | Published: May 25, 2023 02:09 PM2023-05-25T14:09:16+5:302023-05-25T14:17:21+5:30

छावणीत अश्वप्रेमींची दिवसभर गर्दी; पांढरा, काळा, चॉकलेटी या तीन रंगांच्या घोड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी होती.

After three decades, Chhatrapati Sambhajinagar was filled with 'Horse Bazaar'; White horses are most in demand | तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात तब्बल तीन दशकांनंतर छावणीतील आठवडी बाजारात बुधवारी घोड्यांचा बाजार भरला. सुरत, येवाला, उत्तर प्रदेश आदी भागातून मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी घोडे आणले होते. घोडे पाहण्यासाठी, हॉर्सरायडिंगसाठी अश्वप्रेमींनी गर्दी केली होती. दिवसभरात १० पेक्षा अधिक घोड्यांची विक्री झाली. गुरुवारीही बाजार भरविला जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणखी घोडे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शहरात हौशी अश्वप्रेमींची संख्या वाढत आहे. फार्म हाऊस, शेतात, गोडाऊनवर घोडे पाळले जात आहेत. पूर्वी शहरात देशभरातील घोडे विक्रीसाठी येत. ही परंपरा तीन दशकांपासून खंडित झाली हाेती. घोडे खरेदीसाठी नागरिकांना नाशिक जिल्ह्यातील येवला येथील बाजारात जावे लागत असे. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून छत्रपती संभाजीनगर शहरात बाजार भरविण्यात आला. अनेक व्यापाऱ्यांना अद्याप बाजाराबाबत माहिती नाही. त्यामुळे बुधवारी पहिल्या दिवशी ४५ पेक्षा अधिक घाेडे आणण्यात आले. २२ हजारांपासून ६५ हजारांपर्यंत १० घोड्यांची विक्री झाली. 

सकाळी ११:०० वाजता खा. इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांच्या हस्ते बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार कंत्राटदार मोहमद रफीक, जकीयोद्दीन सिद्दीकी, शेरबाज खान पठाण, सलमान खान, सऊद चाऊस, विजू सरोदे आदींची उपस्थिती होती. बाजारातील सोयी सुविधा पाहून व्यापारी मुन्नाभाई यांनी आभार मानले. पुढील दोन ते तीन आठवड्यात बाजार आणखी चांगल्या पद्धतीने भरेल. देशभरातील व्यापारी या मध्यवर्ती ठिकाणी येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुरुवारीही बाजार अशाच पद्धतीने भरविला जाईल.

घोड्याची उंची, दात
घोड्याची उंची किती आहे, किमान ६० सेंटीमीटर उंची असावी, दोन दात आहेत का चार दात, घोडेस्वारी करताना घोडा किंवा घोडी कशी आहे, हे तपासूनच अश्वप्रेमी व्यवहार करीत होते. खरेदीसाठी आलेले नागरिक घोडेस्वारी करून पाहत होते. घोडा दिसायला किती सुंदर आहे, असे अनेक बारकावे खरेदी करणारे पाहत होते. मारवाड, काठीयावाड, चालबाज या प्रजातींना सर्वाधिक मागणी होती.

टाग्यांचे शहर म्हणून होती ओळख
मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरला कधीकाळी टाग्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते. ही ओळख १९८०च्या दशकात हळूहळू पुसट होत गेली. बजाज कंपनीने दुचाकी, तीन चाकी वाहने बाजारात क्रांती आणली. त्यामुळे झपाट्याने टांगे बंद झाले. टांग्यांमुळे छावणीत घोड्यांचा बाजारही भरत होता. १९९० मध्ये तोसुद्धा बंद झाला. तीन दशकानंतर आता पुन्हा शहरातील अश्वप्रेमींनी एकत्र येत घोड्यांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. 

असे झाले बाजाराचे नियोजन
शहरात किमान ४० पेक्षा अधिक नागरिकांकडे प्रत्येकी दोन ते घोडे आहेत. छंद म्हणून अश्वप्रेमी लाखो रुपये यावर खर्च करीत आहेत. एका घोड्याचा उत्कृष्ट सांभाळ करण्यासाठी दरमहा किमान ६० ते ९० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे घोड्यांचा मोठा बाजार भरतो. मराठवाड्यातील अश्वप्रेमींना घोडे खरेदी, पाहण्यासाठी तेथे ये-जा करावी लागत होती. येवला येथे देशभरातून व्यापारी घोडे घेऊन येतात. मात्र, त्यांचा बाजारात योग्य सन्मान होत नाही. कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. जुन्या व्यापाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील अश्वप्रेमींना तुम्हीच बाजार भरवा, अशी विनंती केली. व्हाॅटसॲपवर अश्वप्रेमींचा एक ग्रुप तयार केला. त्यानंतर बैठक घेण्यात आली. सर्वानुमते बाजार भरविण्याचा निर्णय झाला. छावणी बाजारातील जबाबदार मंडळींनीही हिरवी झेंडी दाखविली. व्यापाऱ्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली.

Web Title: After three decades, Chhatrapati Sambhajinagar was filled with 'Horse Bazaar'; White horses are most in demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.