अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 09:51 PM2018-01-17T21:51:47+5:302018-01-17T21:52:44+5:30

: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

After three years, the Chandrakant Khaire group's success in lifting the guardian ministers | अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०१५ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत या तीन वर्षांत कदम आणि खा. खैरे यांच्यात धोरणात्मक वादासह संघटना आणि विकासकामांच्या विविध योजनांवरून वाद झाले. तीन वर्षांत झालेल्या या वादामुळे पक्षात दोन गट पडले. ही उचलबांगडी गटबाजीतून अथवा वादातून झाल्याचे दिसून येऊ नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची गुलाबराव पाटील, नांदेडची रामदास कदम, तर औरंगाबादची डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तसे परिपत्रकदेखील जारी झाले आहे. 
पालकमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेवर बोट ठेवले. ही योजना शहरासाठी घातक असल्याचा आरोप करीत मनपातील शहर अभियंता, आयुक्तांवर शरसंधान करीत खा. खैरे यांचे आर्थिक बलस्थान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केला. येथूनच नाराजीचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजत राहिला. मीच नेता आहे, दुसरे कुणीही नाही, असे बोलून कदम यांनी खैरे यांना डिवचले. मनपातील पदांचे निर्णय, जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांमुळे खैरेंसह त्यांच्या गटातील खदखद वाढत गेली. पालकमंत्र्यांनी काही विशिष्ट समुदायाचे नगरसेवक जवळ केल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत राहिला. परिणामी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचेही पालकमंत्र्यांसोबत कधीही जमले नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी कदम यांच्यांशी जवळीक केली. त्या पदाधिकाºयांना पालकमंत्री बदलल्याचे पचनी पडलेले नाही. खा. खैरेंसोबत ज्यांचे वाद झाले, ते सर्व कदमांच्या जवळ गेले. आता कदमांची उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.

तीन वर्षे गाजले वादग्रस्त वक्तव्यांनी
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या शिवसेनेच्या राजकीय धोरणात्मक मुद्यावरून खैरे आणि कदम यांच्यात दोन टोकांची वक्तव्ये पुढे आली. त्यामुळे सोशल मीडियात वेगळे पडसाद उमटले. समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत खा. खैरे दक्षता समितीच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेत गेले, तर कदम यांनी ती योजना घातक असल्याचे सांगून महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यावर टीका केली. पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली वक्तव्ये पक्षासाठी घरचा अहेर असल्याप्रमाणे आहेत, असे खा. खैरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाºयांनी मातोश्रीवर वारंवार सांगितले; परंतु त्यावर निर्णय होण्यास तीन वर्षे लागली. तीन वर्षे खा. खैरे आणि कदम यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांनी गाजले.

Web Title: After three years, the Chandrakant Khaire group's success in lifting the guardian ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.