तब्बल तीन वर्षांनंतर झालेली बैठकही अनिर्णित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:56+5:302021-01-17T04:05:56+5:30
औरंगाबाद : विद्यापीठ अभ्यास मंडळावर किती सदस्यांची निवड करायची. या सदस्यांच्या प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत. जागा रिक्त झाल्या ...
औरंगाबाद : विद्यापीठ अभ्यास मंडळावर किती सदस्यांची निवड करायची. या सदस्यांच्या प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत. जागा रिक्त झाल्या कशा, काही सदस्यांना अपात्र केले असेल, तर ते त्याची कारणे काय, या संबंधीची यादी सविस्तरपणे अद्यावत करून, ती १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर करावी, असा निर्णय घेऊन तब्बल तीन वर्षांनंतर झालेली आजची स्थायी समितीची सभा उरकण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ.श्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत अभ्यास मंडळ, विद्या शाखांचे चेअरमन व विद्या परिषदेवरील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासंबंधीचा विषय चर्चेला आला. तेव्हा राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, डॉ.सतीश दांडगे व अन्य काही सदस्यांनी या विषयाला हरकत घेतली. या सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, यापूर्वी अधिसभेच्या बैठकीत या विषयावर विद्यापीठ प्रशासनाला लेखी स्वरूपात विचारणा करण्यात आली होती. विभागप्रमुखांमधून किती सदस्य निवडायचे आहेत, किती सदस्यांच्या जागा रिक्त आहेत व त्या जागा कोणत्या कारणाने रिक्त झाल्या. याची सविस्तर माहिती स्थायी समितीसमोर न ठेवता, असंदिग्ध प्रस्तावावर निर्णय कसा घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
किशोर शितोळे यांनी स्थायी समितीची कार्यकक्षा ठरविणे व कार्यपद्धत ठरविण्यावर आक्षेप घेतला. आपल्या समितीची कार्यपद्धत आपणच कशी ठरविणार, असा मुद्दा उपस्थित केला.
या बैठकीला सदस्य सचिव तथा कुलसचिव डॉ.जयश्री कुलकर्णी, डॉ.चेतना सोनकांबळे, राहुल म्हस्के, भारत खंदारे, डॉ.जहुर आदी उपस्थित होते.
चौकट.....
कुलगुरूंनी अध्यादेश जारी करावा
अधिकार नसलेल्या विषयासंबंधी स्थायी समितीला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. दुसरीकडे विद्यापीठ कायदा २०१६च्या परिनियमांना अद्याप विधीमंडळाची मंजुरीही मिळालेली नाही. त्यामुळे कुलगुरूंनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन अद्यादेश जारी करावा. हा अध्यादेश पुढे स्थायी समितीच्या कामकाजासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी रीतसर मागणी किशोर शितोळे यांनी एका पत्राद्वारे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली.