अथक संघर्षानंतर आमदारकी

By Admin | Published: October 22, 2014 12:21 AM2014-10-22T00:21:37+5:302014-10-22T01:19:47+5:30

औरंगाबाद : भाऊबंदकी संपली आणि त्याचे फळ घरात आमदारकी येण्यात झाले.

After the tireless struggle, the legislators | अथक संघर्षानंतर आमदारकी

अथक संघर्षानंतर आमदारकी

googlenewsNext

औरंगाबाद : भाऊबंदकी संपली आणि त्याचे फळ घरात आमदारकी येण्यात झाले. वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार भाऊसाहेब पाटील चिकाटगावकर यांच्या विजयाचे असेच वर्णन करावे लागेल. तब्बल १० वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी जिद्दीने आमदारकी मिळविलीच. कैलास पाटील यांच्यानंतर चिकटगावकर हे नाव सुमारे २० वर्षांनी विधानसभेत उच्चारले जाणार आहे.
तात्या या नावानेही परिचित असलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे नाव विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांपासून संपूर्ण मराठवाड्यात परिचित आहे. २००४ सालच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. १९९९ मध्ये, तर केवळ १,२२५ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, भाऊसाहेब पाटील यांनी जिद्द सोडली नाही. शेवटी ज्यांनी त्यांना दोन वेळा पराभूत केले त्या आर.एम. वाणी यांचा पराभव करूनच ते निवडून आले.
चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्त्वाचे राजकीय घराणे आहे. या घरातील कैलास पाटील चिकटगावकर हे वैजापूरचे आमदार राहिले आहेत. कैलासआबा आणि भाऊसाहेब पाटील यांच्यात राजकीय स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र दोघांनाही आमदारकी मिळविण्यात अपयशच आले. दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ अशी या बंधूंची अवस्था झाली होती. यंदा मात्र कैलासआबांनी सामंजस्य दाखवून भाऊबंदकी संपविली. धाकटे बंधू भाऊसाहेब पाटील यांना पाठिंबा दिला. राज्यात नरेंद्र मोदी यांनी घेतलेला सभांचा धडाका वैजापूरमध्ये मात्र चिकटगावकर यांना फायदेशीर ठरला.
चिकटगाव हे वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब आणि कैलास पाटील यांचे गाव. या घराण्याचे मूळ नाव निकम. मात्र, चिकटगावकर हे नाव मराठवाडाभर आणि कैलास पाटील यांच्यामुळे विधिमंडळातही गेले. भाऊसाहेब आणि कैलासआबा हे पाथ्रीचे माजी आमदार दिगंबरराव वडीकर यांचे जावई. वडीकर यांच्या दोन मुली या चिकटगावकर बंधूंना देण्यात आल्या. भाऊसाहेब यांच्या पत्नी विजयाताई जि.प.च्या उपाध्यक्षाही होत्या.
भाऊसाहेब हे जिद्दी आणि आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. दोन वेळा पराभव होऊनही त्यांनी हार मानली नाही. वैजापूरच्या राजकारणावर कायम आपला ठसा राहील याची काळजी घेतली. भाऊसाहेब पाटील १९९० ते १९९५ या काळात वैजापूरचे नगरसेवक होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी वैजापूर फेस्टिव्हल, उर्स कमिटीमार्फत कव्वाली व संदलचे आयोजन अशा सामाजिक कार्याबरोबरच आर्थिक अडचणीमुळे वैद्यकीय शिक्षण धोक्यात आलेल्या एका विद्यार्थिनीला त्यांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तकही घेतले होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पंचायत समिती ताब्यात घेतली. जिल्हा परिषदेत पक्षाचे तालुक्यातून तीन सदस्य निवडून आणले. वैजापूर नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात असली तरी तेथेही तीन सदस्य, असे बळ आहे. आमदार म्हणून निवडून आल्याने आता वैजापूर तालुक्यावर त्यांची घट्ट पकड निर्माण झाली आहे.
फेसबुकवरही प्रचार
भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे फेसबुक पेजदेखील आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी त्यावर आपल्या कामाच्या तसेच निवडून देण्यासंबंधीच्या पोस्ट टाकल्या आहेत. पेजला तीन हजारांपेक्षा अधिक ‘लाइक्स’ आहेत. फेसबुकवरून १ लाख २१ हजार १११ मतांचे ‘मिशन’ ठेवलेल्या भाऊसाहेब यांनी मोठी मते मिळविली नसली तरी पराभवाची हॅट्ट्रिक चुकविली.

Web Title: After the tireless struggle, the legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.