फटाके फुटले, गुलाल उधळला; २ वर्षानी पराभूत उमेदवारांना आले विजयी पत्र, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:27 PM2023-10-11T17:27:13+5:302023-10-11T17:31:40+5:30
आनंदाच्या भरात गावात फटाके फोडून जल्लोष
- संजय जाधव
पैठण(छत्रपती संभाजीनगर): दोन वर्षापूर्वी पैठण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांना मंगळवारी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाचे पत्र आले. निवडणुकीत आपण विजयी झाले असून दि १३ रोजी आपण जात वैधता प्रमाणपत्रासह तहसील कार्यालयात उपस्थित रहावे असे या पत्रात नमूद केले होते. पत्र हातात पडल्यावर पराभूत झालेल्या उमेदवारां लॉटरी लागल्याचा आनंद झाला. काही जण गावभर पत्र घेऊन मिरवू लागले याउलट त्यांना पराभूत करून निवडूण आलेल्यांंना मधेच हे काय झाले म्हणून जोराचा झटका बसला. शेवटी निवडणूक विभागाने चुकून पराभूत उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आल्याचा तहसील प्रशासनाने खुलासा केल्यानंतर या सर्व प्रकरणावर पडदा पडला.
कोवीड महामारीत सन २०२० - २०२१ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी आल्या होत्या. यामुळे राज्य शासनाने निवडूण आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यासमोर सादर करण्यास मोठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या काळात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि १३ रोजी तहसील कार्यालयात हजर राहण्या बाबत नोटीसा बजावण्यात आल्या. मात्र नोटीस बजावतांना पैठण तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने सरसकट पराभूत व वीजयी उमेदवारांना आपण निवडूण आला असल्याने दि १३ ला हजर रहावे अशा नोटीस बजावल्या आणि गावा गावात राजकीय ड्राम निर्माण झाला.
पराभूत झालेल्या उमेदवारांनी हजर रहायची गरज नाही
दरम्यान पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी या बाबत खुलासा करताना सांगितले की, निवडणूक विभागातून चुकीने या नोटीसा पराभूत उमेदवारांना बजावण्यात आल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी हजर राहू नये असेही चव्हाण यांनी सांगितले. काजल संतोष राठोड रा. ब्राम्हणगांव, ता. पैठण यांनाही कागदपत्रासह हजर राहण्याची नोटीस मिळाली. या बाबत त्यांनी ताबडतोब तहसीलदार पैठण यांच्याशी संपर्क साधून खुलासा करून घेतला.
एकाने वाजवले फटाके
एका गावातील पराभूत उमेदवाराने विजयी झाल्याचे पत्र मिळताच गावात फटाके फोडले.जवळच्या कार्यकर्त्यांनी हे कसे झाले असे विचारले असता त्याच्या नेत्याने राईट कार्यक्रम केला असे सांगून नेत्याला क्रेडीट दिले.दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर सदर पराभूत उमेदवार गावातून निघून गेल्याचे समजले.