राखी बांधल्यानंतर मानलेल्या बहिणीवर आठवडाभरातच केला अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:30 PM2022-06-30T15:30:25+5:302022-06-30T15:31:22+5:30
आरोपीने अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण केले. कोणाला काही सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
औरंगाबाद : मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन बहिणीवर (१३ वर्षे) अत्याचार करणारा आरोपी रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्लादादा (२३, रा. भावसिंगपुरा) याला सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी बुधवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ६२ हजार रुपये दंड ठोठावला.
दंडाच्या रकमेपैकी २५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे. घटनेच्या एक आठवड्यापूर्वीच रक्षाबंधनाच्या दिवशी रामदासने पीडितेकडून राखी बांधून घेतली होती. ओवाळणीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मात्र, तुला पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग देतो, असा बहाणा केला होता. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या आई- वडिलांचे निधन झाले असून, परिचारिका असलेली मोठी बहीण तिचा सांभाळ करते. रामदास पीडितेच्या मोठ्या बहिणीचा मानलेला भाऊ आहे.
३१ ऑगस्ट २०२१ रोजी पीडिता एकटीच घरी होती. सकाळी रामदास पीडितेच्या घरी आला. बहिणीने तिला त्याच्यासोबत ट्रेनिंगला जाण्यास सांगितले.
पीडिता व रामदास दर्गा रोडपर्यंत पायी आले. तेथे आरोपीचे दोन मित्र कारमध्ये होते. आरोपीने तिला कारमध्ये बसवून राजेशनगरातील दुमजली इमारतीत नेऊन व्यायाम करण्यास सांगितले. त्यानंतर अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण केले. कोणाला काही सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर मुलीला घरी आणून सोडले. मुलीने घटना बहिणीला सांगितली. याबाबत पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन उपनिरीक्षक एम.एल. चव्हाण यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी ४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.