उडीद-मुगानंतर आता सोयाबीनचाही प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:41 AM2017-10-28T00:41:04+5:302017-10-28T00:41:11+5:30
जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.
यंदा शासनाने सोयाबीनला तीन हजारांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या हाती अठराशे ते चोवीससे रुपये पडत आहेत. किरकोळ ढीग दोन हजार आठशे रुपयांपर्यंतच्या किमतीतही घेतले जात आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्र वेळेत सुरू केले जात नाहीत. नाफेडची खरेदी हिंगोलीत खरेदी-विक्री संघामार्फत केली जाणार आहे. या संस्थेच्या संबंधितांना विचारले तर त्यांनी सोयाबीन उत्पादकतेचा अधिकृत कोणताच पुरावा आला नसल्याचे सांगितले. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या सूचनांनुसारच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पीक पाहणी प्रयोगातून निश्चित केलेल्या आणेवारीप्रमाणेच मालाची खरेदी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच उडीद व मुगाची उत्पादकता कमी असल्याने त्या तुलनेत खरेदी सुरू असल्याचेही ते म्हणाले. तर आता सोयाबीनचा अहवाल मिळताच केला जाईल, असे सांगितले. दुसरीकडे कृषी विभाग मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल तयार होईल, असे सांगत होता. त्यामुळे सोयाबीनची हमीभावाने खरेदी बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी राहण्याची शक्यता आहे.
संतोष टारफे यांचे निवेदन
आ.संतोष टारफे यांनी कळमनुरी येथेही नाफेडमार्फत हमीभावात शेतीमाल खरेदी सुरू करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तर मूग व उडदाची हेक्टरी तीन क्विंटलची मर्यादा उठवा, कापूस खरेदी केंद्र सुरू करून ७ हजार हमीभाव द्या, कर्जमाफी तातडीने शेतकºयांच्या खात्यावर जमा करा आदी मागण्या केल्या आहेत.