गोवर- रुबेला लसीकरणानंतर ४ लाखांत २० बालकांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:08 PM2018-12-01T22:08:40+5:302018-12-01T22:09:01+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत पाच दिवसांत चार लाखांवर बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २० मुलांना बाधा झाली. परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी शनिवारी दिली.

औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांत एकूण २० बालकांना लसीकरणानंतर बाधा झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, यात घाबरण्याचे कारण नसून बाधा होण्याची विविध कारणे आहेत. अनेकदा मुलांना लसीची काहीशी भीती वाटते. तर काही वेळा मुलांनी काही खाल्लेले नसते. यासह बाधा होण्याची इतरही कारणे असू शकतात. परंतु लसीकरणातून कोणताही धोका नाही.
काही झाले तर त्यासाठी तात्काळ उपचारही उपलब्ध आहेत. मुले तज्ज्ञांच्या निगराणीखाली असतात. त्यामुळे अशा घटनांमध्ये घाबरून जाऊ नये. गोवर आणि रुबेला या जीवघेण्या आजारांना हद्दपार करण्यासाठी हे लसीकरण गरजेचे असल्याचे डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले. आतापर्यंत वीस राज्यांत दहा कोटी बालकांना ही लस देण्यात आली आहे. याचाही विचार पालकांनी करून या लसीकरणात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
---------------