'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:27 PM2022-08-26T13:27:04+5:302022-08-26T13:27:25+5:30
पडताळणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासकांनी दिली
औरंगाबाद : शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यानुसार महापालिका उपाययोजना करीत आहे. पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, असे मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते दिल्ली गेटपर्यंत तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, संंच बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू करणे, गळत्या शोधणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शहर पाणीपुरवठा योजनेतील जुनी ५६ मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी १९३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली असून, आराखडा शासनाला सादर केला जाईल. एमजेपीकडून ती योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता पूर्ण निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी केल्याचे चौधरी यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सूचना
उच्च न्यायालयाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. पडताळणीनंतर खात्री पटल्यानंतरच तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होईल.