बोंडअळीनंतर आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या हिरव्या अळीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:24 PM2018-08-10T14:24:28+5:302018-08-10T14:26:00+5:30
बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कापसावर आता पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या)अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सोयगाव तालुक्यात आज आढळून आले.
सोयगाव (औरंगाबाद ) : बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कापसावर आता पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या)अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सोयगाव तालुक्यात आज आढळून आले. याबाबत तालुका कृषी विभागाच्या पथकाकडून सकाळी तातडीने परिसरातील शेतात पाहणी करण्यात आली.
तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून बोंडअळींच्या प्रादुर्भावाने कापूस पिके बाधित होत आहेत. यातच आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या) अळींचा वाढता प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा धडकी भरली आहे. या हिरव्या अळ्या वाढीस लागलेल्या कापसावरील हिरवी पाने गुंडाळून कुरतडत आहेत. यांच्या प्रादुर्भावाने सोयगाव तालुक्यातील कापूस पिकांवरील फुले,पात्यासह पानेही खराब होत असल्याने पिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कृषी विभागाच्या बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण अॅप्सद्वारे निरीक्षणासाठी घेतलेल्या कापसाच्या क्षेत्रात अचानक या हिरव्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने,कृषी विभागातही चिंतेचे वातावरण आहे.
प्रयोगामुळे पिके कमकुवत
तालुक्यातील कापूस पिकावर कृषी विभागाच्या निरीक्षणाच्या विविध प्रयोगांनी झाडे आणखी कमकुवत होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कीड सर्वेक्षण,सल्ला केंद्र अॅप्सच्या निरीक्षणात सहा गावांच्या ८९१ हेक्टरवरील क्षेत्र बोंडअळींच्या प्रादुर्भावाने बाधित झाल्याचा अहवाल पुण्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संस्थेने दिला असून, मध्येच(पाने खाणाऱ्या)हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या पिकाला घातक ठरला आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
सावळदबारा,घानेगाव तांडा,नांदातांडा या भागात हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव आढळल्याने कृषी विभागाचे कैलास कुमावत यांच्या सह पथकाने शेतावर जावून पाहणी केली. तसेच यावरील उपाय-योजनांबाबत शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन केले.
ग्रामसभा व शिवार फेऱ्यातून माहिती
तालुक्यात बोंडअळींच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका कापूस पिकांना बसला आहे. याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या पथकाने गावांना भेटी देवून शिवार फेऱ्या काढून ग्रामसभाद्वारे विशेष मार्गदर्शन व उपाय-योजनाची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.