तूर खरेदीवरून पुन्हा वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:37 AM2018-02-10T00:37:04+5:302018-02-10T00:37:07+5:30
फेअर अॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : फेअर अॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला. या गोंधळामुळे अर्धा ते एक तास जाधववाडीतील शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली होती.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर मागील ५ दिवसांमध्ये ३१० शेतक-यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले असून, २० शेतक-यांकडून १७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीचे काम नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे. आज सकाळी तूर खरेदी केंद्राबाहेर तीन ते चार पिकअप वाहने व दोन ट्रॅक्टर भरून शेतक-यांनी तूर विक्रीस आणली होती. येथे गुणवत्ता तपासणी कर्मचारी विनायक डक हे तुरीची तपासणी करीत होते. यावेळी वरूड काझी येथील इलियास बेग व कृष्णा दांडगे या दोन शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. त्यांच्यातील एक जणाची तूर तपासणी करताना त्यात भुंगे आढळून आले. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सरासरी चांगला दर्जा (एफएक्यू) नसल्याने ती तूर रिजेक्ट करण्यात आली. पहिले तूर चाळणी यंत्रात साफ करून मग तपासणी का करीत नाही, असा सवाल उपस्थित करून केंद्राबाहेर येऊन अर्धा किलो तूर जमिनीवर टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केला. शासनविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळ उडाला गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रप्रमुख ए. एस. तटवारे यांनी केंद्राचे शटर खाली घेतले. काही वेळात जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठही तेथे दाखल झाले. खाडे यांनी त्या दोन शेतक-यांनी आणलेल्या तुरीची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पिकअप वाहनामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या पोत्यातून तुरी काढून विनायक डक यांनी पुन्हा तपासणी केली व निकृष्ट तूर असल्याचे अहवाल दिला. यावेळी टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनने संपूर्ण तपासणीची शूटिंग केली. यानंतर ‘वाद’ मिटला. नंतर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांच्या तुरीची तपासणी करण्यात आली.
याआधी ५ फेब्रुवारी रोजी काही शेतक-यांनी कृउबा समिती येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला होता. त्यावेळी हेक्टरी कमी तूर खरेदी करीत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला होता. असे प्रकार नेहमी होत असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचा-यांनी केली.