पुन्हा एक दिवसाची निर्जळी
By Admin | Published: September 11, 2014 01:26 AM2014-09-11T01:26:06+5:302014-09-11T01:26:18+5:30
औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पितृपक्षातच पालिकेमुळे नागरिकांना पाणी-पाणी करावे लागणार आहे.
पालिकेने आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या गळत्यांची डागडुजी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय आहे. मनपा जरी एक दिवस शटडाऊन घेणार असल्याचे कळविले असले तरी पाणीपुरवठ्यावर आठवडाभर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७००, १,२००, १,४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे.
सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांचा कालावधी डागडुजी करण्यासाठी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विभाग बंद ठेवण्यासाठी आजवर पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती.
काय काम करणार यंत्रणा
जायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्तीसह जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. महावितरणला मनपाने १५ लाख रुपये देऊन अपडेट केलेली वीजपुरवठ्याची यंत्रणेची जोडणीही १५ रोजी होणार आहे. शटडाऊन घेण्यासाठी आयुक्त महाजन यांनी मंजुरी दिली आहे.