जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी
By Admin | Published: October 10, 2016 12:06 AM2016-10-10T00:06:55+5:302016-10-10T00:12:40+5:30
लातूर : सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा मोठा पाऊस झाला असून, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे
लातूर : सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा मोठा पाऊस झाला असून, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासांत साकोळ महसूल मंडळात २०५, निटूरमध्ये १३४ आणि अंबुलगा महसूल मंडळात ९१ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे धनेगाव बॅरेजेसचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या नदीपात्रातून साडेतीन मीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीवाडी, हंचनाळ गावात संपूर्ण शिवार पाण्याखाली असून, औराद परिसरात मांजरा नदीला पूर आला आहे. औराद, वांजरखेडा, हलसी-तुगाव पुलावर पुन्हा पाणी आले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. तेरणाचे बॅकवॉटर पसरत आहे. औराद येथील जुन्या पुलाच्या पायऱ्याखाली पाणी आले आहे. शिवाय, कवठाळा-वलांडी रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. साकोळ महसूल मंडळात एका रात्रीत २०५ मि.मी. पाऊस झाला असून, अनेकांच्या घरांत पाणी शिरले आहे. शिवाय, विजेचे पोल पडल्यामुळे अर्धे गाव अंधारात आहे. साकोळच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस पडला आहे.