सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी, तसेच समर्थनासाठी राज्यभरात मोर्चे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:09 AM2019-12-28T06:09:11+5:302019-12-28T06:09:34+5:30
विविध संघटना सहभागी : तहसीलदारांना दिले निवेदन
औरंगाबाद : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारीदेखील राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघाले. औरंगाबादमध्ये ४० विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अहमदनगरमध्येदेखील भव्य मोर्चा काढण्यात आला. विदर्भात चंदपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे आणि यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीतही मोर्चे काढण्यात आले.
अहमदनगरमध्ये ‘नही चलेगा, नही चलेगा, सीएए, एनआरसी नही चलेगा..., इन्कलाब जिंदाबाद..., जोडो जोडो, भारत जोडो..., संविधान बचाओ, देश बचाओ... ’ अशा घोषणा देत मुस्लिम समाजासह इतर संघटनांनी तिरंगा ध्वज हातात घेत जनआक्रोश महामोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
कोठला स्टॅडपासून दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. कोठला स्टॅण्ड, जीपीओ चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शांतता व शिस्तबद्धता हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.
मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, मौलाना आझाद, डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कलाम या महापुरुषांच्या प्रतिमांसह तिरंगा ध्वज, भगवे ध्वज व निळे ध्वज घेऊन तरुण सहभागी झाले होते़ महापुरुषांच्या वेशात सहभागी झालेल्या लहान मुली व मुले मोर्चात लक्षवेधी ठरले़
भद्रावती (जि. चंद्रपूर)येथील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने शुक्रवारी भद्रनागस्वामी मंदिर पटांगण ते पेट्रोल पंप चौकापर्यंत नागरिकत्व कायद्याविरोधात संविधान बचाव रॅली काढली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भिम आर्मी, बिआरएसपी, बिएसपी, आरपीआय, भाकपा, राष्ट्रीय मुस्लिम समिती, आदिवासी समाज संघटना, शेतकरी संघटना, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना व विमुक्त जाती, जनजाती विकास परिषद व जमाते इस्लामी संघटनेचे पुरुष-महिला मोठ्या संख्येनी सहभागी झाले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलादारांना देण्यात आले.
घाटंजी (यवतमाळ) येथील तालुका जन संघर्ष समितीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मोर्चात सर्वच स्तरातील लोकं सहभागी झाले.
समर्थनार्थ फलटण, भिवंडी, फैजपूरला निघाले मोर्चे
केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फलटणमध्ये प्रबोधन मंच आणि राष्ट्रप्रेमी देशभक्त विविध संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतही समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. खासदार कपिल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मीरा- भार्इंदरमध्ये सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर (ता. यावल) येथे राष्ट्रीय सुरक्षा मंच व शहरातील हिंदू संघटनांतर्फे रॅली काढण्यात आली.
तरूणांनी हाती घेतलेल्या ७५ मीटर लांबीच्या तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चात अग्रस्थानी दिव्यांग सेनेचे पदाधिकारी, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.