बदली धोरणाविरुद्ध औरंगाबादेत शिक्षक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:18 AM2018-04-30T00:18:04+5:302018-04-30T00:19:29+5:30
अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर ‘२७/२ बदली धोरण विरोध, बदल्यांची खो-खो पद्धत बंद करा,’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.
विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत विसर्जन झाले. त्यात शिक्षकनेते संभाजीराव थोरात व प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह अनेकांची घणाघाती भाषणे झाली. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या गावी परळीला हा मोर्चा निघणार होता; परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे तो औरंगाबादला काढण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने व्हॉट्सअॅपवर उलटसुलट पोस्ट टाकून संभ्रम निर्माण करणाºयांविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघातर्फे तालुकावार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आजच्या सभेत देण्यात आले.
शेख इसाक पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध .... चौकट
प्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख इसाक पटेल यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताला मार लागला. औषधोपचार सोडून ते आज मोर्चात सहभागी झाले होते व त्यांनी सभेत भाषणही केले. हल्लेखोर कोण, याचा तपास लागला नसून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून अशा हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे पटेल यांनी या सभेत ठणकावून सांगताच ‘भ्याड हल्ल्याचा निषेध असो, हल्लेखोरांना त्वरित अटक झालीच पाहिजे, अशा घोषणांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर दणाणला.
प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन नऊगरे, एन.वाय. पाटील, विनोद राऊत, मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, अनुराधा ताकटे, रावसाहेब रोहकले, सिद्धेश्वर पुस्तके, गजानन पटोकार, मोहन भोसले, तात्यासाहेब मेघारे, राम लोहट, भक्तराज दिवाणे, तानजी खोत, आबा जगताप आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
या मोर्चास केंद्रप्रमुख शिक्षक संघ, जि.प. कर्मचारी युनियन आदींनी पाठिंबा दिला होता. जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, दिलीप साखळे, संजय भुमे, जे.के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, संतोष ताठे,
संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, बाबासाहेब जाधव, राजेंद्र महाजन, ज्ञानेश सरोते, ईश्वर पवार, राहुल पवार, अशोक डोळस, राजेश पवार आदींनी या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चासाठी शिक्षक मागण्यांचे फलक घेऊन आले होते. शिक्षिकांनी स्कार्फ जवळ ठेवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकºयांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय भगवान महासंघातर्फे करण्यात आली होती. सभास्थळाच्या प्रवेशद्वारासमोर शहाजी नगरे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.
धोरणात असा बदल असावा...
प्रशासकीय बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्केच कराव्यात, विनंती बदल्यास टक्केवारी नसावी, संवर्ग १, २ व ३ च्या बदल्या करण्यास प्रथम प्राधान्य देऊन त्यांची सोय करावी, बदल्यांतील खो-खो पद्धत बंद करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे धोरण असावे.
बदलीसाठी जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याऐवजी शाळेवरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी, एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा त्या शिक्षकाची पाच वर्षे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात येऊ नये, ३० कि.मी.बाहेरील पती-पत्नी एकत्र करताना ३० कि.मी.च्या आतील असणारास विभक्त करू नये.