आता डॉक्टर होण्याच्या स्वप्नपूर्तीस वयाची अट नाही, नीट परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 03:50 PM2022-03-14T15:50:38+5:302022-03-14T15:55:02+5:30
आता डाॅक्टर होण्याला वाढत्या वयाची अडचण येणार नाही...!
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘नीट’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने ‘नीट’ देणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता डाॅक्टर होण्याला वाढत्या वयाची अडचण येणार नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ही भारतातील एकमेव प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. सन २०१९ मध्ये ‘एनएमसी’ ने पदवी परीक्षेसाठी २५ वर्षांची उच्च वयोमर्यादा लागू केली होती. त्याला उमेदवारांकडून जोरदार विरोध झाला. यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कमाल वयोमर्यादेची अट आता रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला कोणतीही निश्चित कमाल वयोमर्यादा नसणार आहे. त्यामुळे वयोमर्यादेअभावी डाॅक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
सामान्य वर्गासाठी २५, तर राखीवसाठी होती ३० ची अट
‘नीट’साठी अर्ज करणाऱ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ वयोमर्यादा ठरवण्यात आली होती, तर आरक्षणातील विद्यार्थ्यांना ५ वर्षे अधिक देण्यात आली होती. म्हणजे राखीवसाठी ३० वयोमर्यादा होती. मात्र, नव्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नीट परीक्षेसाठीची कमाल वयोमर्यादा हटविली
- राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी पात्रता निकषांमध्ये सुधारणा केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला लिहिलेल्या पत्रात पात्रतेमध्ये सुधारणा करण्याचा आणि त्यातून उच्च वयोमर्यादा काढण्याची सूचना दिली.
- त्यानंतर एनएमसीने नीट यूजी परीक्षेला बसण्यासाठी विहित वयोमर्यादा काढून टाकली आहे. नीट यूजी परीक्षेच्या वयोमर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
तज्ज्ञ म्हणाले...
एक चांगला निर्णय
‘एनएमसी’ द्वारे सुधारित राजपत्र जारी केल्यावर हा निर्णय राष्ट्रीय परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्था आणि सर्व राज्यांसाठी सार्वत्रिक मार्गदर्शक तत्त्वे बनतील. ‘एनएमसी’तर्फे अधिकृतपणे जाहीर केल्यावर मला वाटते की, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी हा एक चांगला निर्णय असेल.
- डाॅ. मिर्झा शिराज बेग, उपाधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
संधीचे सोने करतील
लाॅकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना घरी रहावे लागले. त्यामुळे म्हणावा तसा अभ्यास झाला नाही. इलेक्ट्रिक माध्यमांचा परिणाम झाला. लेखनावर, वाचनावर परिणाम झाला. त्यामुळे परीक्षेला सामोरे जातानाचा आत्मविश्वास कमी झाला आहे. पण, वयाच्या अटीविषयी घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांना फायदा होईल. संधीचे सोने विद्यार्थी करू शकतील.
- डाॅ. बालाजी नागटिळक, प्राचार्य, स.भू. विज्ञान महाविद्यालय
विद्यार्थ्यांमध्ये आंनदोत्सव
बी. एसस्सी झालेल्यांनाही संधी
१२ वी होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना करिअरविषयी काही लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते, तेव्हा वय निघून जाते; परंतु आता बी. एसस्सी झालेला विद्यार्थीही नीट देऊ शकेल.
- शुभम दांडगे
वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग
आधी निर्णय चुकलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. वय निघून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही नीटची तयारी करता येईल. एकप्रकारे वैद्यकीय प्रवेशाचा विद्यार्थ्यांसाठी मार्ग मोकळा झाला.
- प्रथमेश बेराड