अबब..! वय अवघे ३२, वजन तब्बल १६६ किलो; सरकारी रुग्णालयातील सर्जरीने वाचले प्राण
By संतोष हिरेमठ | Published: June 2, 2023 04:45 PM2023-06-02T16:45:55+5:302023-06-02T16:46:40+5:30
हर्नियाची गुंतागुंत शस्त्रक्रिया यशस्वी; शस्त्रक्रियेसाठी जोडले दोन ‘ओटी’ टेबल
छत्रपती संभाजीनगर : तिचे वय अवघे ३२ वर्षे. वजन तब्बल १६६ किलो. अशा अवस्थेत तिच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया ओढावली. गुंतागुंत अवस्थेमुळे खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला; परंतु, छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डाॅक्टरांनी हे आव्हान स्विकारले आणि तिची हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविण्याची किमया केली.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय आणि १६६ किलो वजन असलेली महिला २७ मे रोजी गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झाली. सोबत नातेवाइक होते. तिच्यावर हर्नियाची (एपिगॅस्ट्रिक हर्निया) शस्त्रक्रिया करणे गरजेची होती; परंतु, अतिलठ्ठपणा, हायपोथायरॉइडीझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड आणि काहीसे धोकादायक होते. कारण अशा अवस्थेत शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर रुग्ण भुलीतून लवकर परत येत नाही. शिवाय शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गाठ होणे, न्यूमोनिया, टाके तुटण्याची भीतीही होती. ही सगळी आव्हाने स्विकारून घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने २९ मे रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. शस्त्रक्रियेसाठी असलेले ओटी टेबल हे सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने असतात. त्यामुळे दोन ओटी टेबल जोडून त्यावर रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. जुनेद शेख, डाॅ. आरीफ काझी यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डाॅ. रश्मी बंगाली, डाॅ. ज्योती कुलकर्णी, डाॅ. अश्विनी सोनटक्के यांनी भूल दिली. निवासी डाॅक्टर डाॅ. विनोद परमार, डाॅ. रजनिकांत किडे, डाॅ. चेताली मुरंबीकर, डाॅ. अर्पीत अग्रवाल, डाॅ. अर्कम अन्सारी, डाॅ. मधुसूदन पतारु, डाॅ. रोहिणी बोडगिरे, ब्रदर रवी भोखरे, माधव कांबळे, अमीन शेख यांनी सहकार्य केले.
मोठ्या आकाराची ट्राॅली, मोठ्या आकाराची सुई अन्...
- रुग्णाचा रक्तदाब पाहण्यासाठी मोठ्या आकाराचा ‘बीपी कफ’ मशीन मागविण्यात आले.
- रुग्णाला वाॅर्डातून शस्त्रक्रियागारात हलविण्यासाठी आणि परत वाॅर्डात आणण्यासाठी मोठ्या आकाराची ट्राॅली मागविण्यात आली.
- रुग्णाच्या पाठीत भुलीचे इंजेक्शन देण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त लांबीची सुई मागविण्यात आली.
- शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आयसीयूत ठेवून सतत देखभाल केल्याने सर्व आव्हानांवर मात करणे सोपे झाले.