रिक्षा स्क्रॅप केल्याचा आरटीओला बनावट अहवाल देणाऱ्या एजंटला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 08:42 PM2021-02-26T20:42:34+5:302021-02-26T20:44:22+5:30
जुनी रिक्षा वापरण्यायोग्य नसल्याने ती रिक्षा (एमएच- २० बीटी- ६४२०) भंगारात काढण्याचे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते.
औरंगाबाद : २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या रिक्षाचे (स्क्रॅप) तुकडे केल्याचा मोटार वाहन निरीक्षकाचा बनावट अहवाल तयार करून आरटीओ कार्यालयात सादर करणाऱ्या रिक्षामालकासह एजंटविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी झटपट कारवाई करीत एजंटला शुक्रवारी अटक केली. मिर्झा अकबर बेग (रा. कटकटगेट) असे अटकेतील एजंटचे नाव आहे. या गुन्ह्यात रिक्षामालक शेख कमरोद्दीन शेख इस्माईल (रा. मकसूद कॉलनी) याचा पोलिसांनी शोध सुरू केला.
वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले की, तक्रारदार रवींद्र दत्तात्रय नारळे हे येथील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक आहेत. कमरोद्दीन याच्या मालकीची जुनी रिक्षा वापरण्यायोग्य नसल्याने ती रिक्षा (एमएच- २० बीटी- ६४२०) भंगारात काढण्याचे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते. त्यांच्या वतीने आरटीओ कार्यालयातील काम करण्याचे अधिकार त्यांनी एजंट अकबर मिर्झा याला दिले होते. दोघांनी ही रिक्षा करोडी येथील आरटीओ कार्यालयात घेऊन तेथे मोटार वाहन निरीक्षक नारळे यांच्यासमोर रिक्षा स्क्रॅप करतो, असे सांगितले.
याबाबतचे आदेश त्यांनी स्टेशन रोडवरील आरटीओ कार्यालयाकडून घेतले. यानंतर ते रिक्षा घेऊन करोडी येथील आरटीओ कार्यालयात गेले नाही. उलट त्यांनी मोटार वाहन निरीक्षक नारळे यांच्यासमोर रिक्षा स्क्रॅप केल्याचा त्यांच्या सही आणि शिक्क्याचा बनावट अहवाल आरटीओ कार्यालयात सादर केला. याविषयी माहिती मिळताच नारळे यांनी हा अहवाल पाहिला असता त्यावर बनावट सही शिक्के मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रिक्षा वापरात ठेवण्यासाठी आरोपींनी संगनमत करून रिक्षा स्क्रॅप न करता बनावट अहवाल तयार करून फसवणूक केल्याचे त्यांना समजले. १० डिसेंबर २०२० ते २४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान हा प्रकार झाला. याविषयी त्यांनी आरोपी रिक्षामालक कमरुद्दीन आणि एजंट मिर्झा अकबरविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार नोंदविली. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एजंटला अटक केली.
....