छत्रपती संभाजीनगरच्या सेक्स रॅकेटमधील एजंटचा ८ पेक्षा अधिक देश, भारतातील ८४ शहरांत संपर्क
By सुमित डोळे | Published: January 18, 2024 12:18 PM2024-01-18T12:18:26+5:302024-01-18T12:20:17+5:30
दर आठवड्याला विदेशातील मुलींची तस्करी; उच्चभ्रू ग्राहकांकडून बड्या हॉटेल्सची निवड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सेक्स रॅकेटच्या एजंटचे जगभरातील ८ तर देशातील ८४ पेक्षा अधिक शहरांतील एजंटसोबत नित्याचा संबंध आहे. रोज टेलिग्राम, व्हॉट्सॲप व अन्य चॅटिंग ॲपद्वारे त्यांचे एकमेकांशी कॉलवर संपर्क होतो. त्याद्वारे आठ दिवसाला शहरात मागणीनुसार विदेशी मुलींची देहविक्रीसाठी तस्करी होते. विशेष म्हणजे, शहरातील काही नामांकित हॉटेलमध्ये या विदेशी मुलींसाठी उच्चभ्रू नागरिक व्यवहार ठरवतात. बीड बायपासवरील मंगळवारच्या कारवाईच्या एक दिवस आधीच उझबेकिस्तानची मुलगी जालना रस्त्यावरील एका बड्या हॉटेलमध्ये होती, हे तपासात आढळले.
बायपासवरील सेनानगरमध्ये उपायुक्त नवनीत काँवत, निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी कुख्यात सेक्स रॅकेट चालक तुषार राजन राजपूत (४२, रा. न्यायनगर) व प्रवीण बालाजी कुरकुटे (रा. बाळापूर) यांनी किरायाने घेतलेल्या बंगल्यावर छापा टाकला. तेथे दिल्लीच्या दोन तर उझबेकिस्तानची एक तरुणी आढळून आली. उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी तुषार, प्रवीणसह तेथे मदतीसाठी काम करणारे गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव (रा. घनसावंगी), लोकेशकुमार केशमातो (३५) व अर्जुन भुवनेश्वर दांगे (दोघेही रा. झारखंड) यांना अटक केली. अंमलदार विशाल सोनवणे, लालखान पठाण, सुभाष शेळके, विजयानंद गवळी यांनी कारवाई पार पाडली. तिघी तरुणींची शासकीय आधारगृहात रवानगी करण्यात आली.
या मुद्यांवर मागितली पाेलिस कोठडी
-मुलींच्या भाषेसाठी दुभाषक म्हणून कोणाला वापरले जाते, त्यांचा शोध घ्यायचा आहे.
-शहरातील आणखी एजंट निष्पन्न करणे आहे.
-एजंट, ग्राहकांमधील आर्थिक व्यवहार निष्पन्न करणे.
बाहेरील ग्राहकांची जबाबदारी प्रवीणवर
बीड, पैठण, जालना, परभणी, फुलंब्री, सिल्लोड येथील ग्राहकांसोबत संपर्क साधण्याची जबाबदारी प्रवीण सांभाळतो. तुषार प्रामुख्याने शहरातील बड्या ग्राहकांच्या संपर्कात राहतो. ८ ते २० हजार रुपयांपर्यंत देहविक्री चालते. पोलिस त्या व्यवहाराच्या मार्गाचा तपास करत आहेत. तुषारच्या मोबाइलमध्ये देशभरातील शेकडो एजंट, शहरातील ग्राहकांचे ६०० ते ७०० संपर्क क्रमांक आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलींना दिले नवे सिमकार्ड
विशेष म्हणजे, रॅकेटचे राष्ट्रीय एजंट उझबेकिस्तान व आसपासच्या ६ ते ७ देशांमधल्या गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून देशात आणतात. उझबेकिस्तानच्या मुलीला तुषारने तिचा मोबाइल वापरण्यास बंदी केली होती. शहरात येताच त्याने तिला स्वतंत्र सीमकार्ड व मोबाइल दिला.