खाजगी मेडिकल स्टोअरच्या एजंटांची घाटी रुग्णालयात भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:49 PM2024-09-10T14:49:15+5:302024-09-10T14:52:23+5:30
शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळतात का?
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात जन औषधी केंद्र असून, याठिकाणी औषधींच्या किमतीवर कमीत कमी ५ टक्के आणि जास्तीत जास्त ८० टक्के सूट दिली जात आहे. या केंद्रापेक्षा स्वस्त औषधी दिली जाईल, असे सांगत खासगी मेडिकल स्टोअरचे एजंट घाटीत घुसखोरी करीत असल्याचीही परिस्थिती आहे.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत २४ तास जेनेरिक औषधी मिळणार असा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार घाटीत जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. घाटीत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना औषधी चिठ्ठ्या देणे बंद करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे औषधी दुकानांवर जाणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाल्याची स्थिती आहे.
शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधींचा जीआर
शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधी मिळतील, यादृष्टीने निर्णय घेतला. त्यानुसार घाटी रुग्णालयात जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले.
८० टक्क्यांपर्यंत स्वस्त; २४ तास सेवा
घाटीतील जन औषधी केंद्रावर औषधींच्या ‘एमआरपी’वर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. म्हणजे रुग्णांना ८९ टक्क्यांपर्यंत औषधी स्वस्त मिळतात. हे केंद्र २४ तास सुरू असते.
‘लोकमत’ने काय पाहिले?
जेनेरिक औषधी, ...तर ब्रँडेड : रुग्णांना जेनेरिक औषधी देण्यावर भर दिला जातो. ज्या औषधीला जेनेरिकचा पर्याय नाही, अशांनाच ब्रँडेड औषधी दिली जातात.
बिलात सवलत नमूद : रुग्णांना औषधीच्या ‘एमआरपी’वर किती सूट मिळाली, हे बिलामध्ये नमूद केले जात असल्याचे पाहायला मिळाले.
२४ तास सुरू : घाटीतील जन औषधी केंद्र हे २४ तास सुरू असते.
९५ टक्क्यांवर चिठ्ठीमुक्त
घाटी रुग्णालय जवळपास ९५ टक्क्यांवर चिठ्ठीमुक्त झाले आहे. बाहेरून औषधी आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देणे आता थांबले आहे. जन औषधी केंद्र ही शासनाची योजना आहे. याठिकाणी ‘एमआरपी’वर ५ टक्क्यांपर्यंत सूट देणे बंधनकारक आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता