पैठणमध्ये अघोरी कृत्य ! मंदिरात आढळला युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 08:34 PM2020-12-10T20:34:56+5:302020-12-10T20:36:49+5:30
Crime News Aurangabadअंधश्रद्धेतून हे अघोरी कृत्य झाले असावे असा संशय
पैठण : शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात कहारवाडा येथील रहिवाशी असलेल्या २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला मृृृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तरूणाचा मृतदेह महादेवाच्या पिंडीलगत असल्याने पिंड रक्ताने माखून निघालेली होती. यामुळे हे अघोरी कृत्य अंधश्रद्धेतून झाले असावे अशी चर्चा होत आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला असून परिसर सील करून तपास सुरू केला आहे.
पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असताना पुन्हा एका घटनेने आज पैठण शहर हादरले आहे. गोदावरी काठालगत असलेल्या गंगेश्वर महादेव मंदीरात गुरूवारी सायंकाळी पैठण शहरातील कहारवाडा येथील रहिवाशी नंदू देविदास घुंगासे वय २५ वर्ष या युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार रामकृष्ण सागडे, यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने तरूणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. महादेवाच्या पिंडीला बिलगून गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे रक्त पिंडीवर पडत होते. मंदिरात पोलिसांना धारदार कटरचा एक तुकडा सापडला असून याच कटरने हत्या किंवा आत्महत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नंदू घुंगासे हा पैठण मच्छी मार्केटमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करत होता. परंतु, वर्षभरापूर्वी मासेविक्री बंद करून मासे पकडण्याचे जाळे विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला असे कहारवाडा प्रभागाचे नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले. मयत नंदूची आई व नंदू या महादेवाचे भक्त होते. नंदूची आई नियमितपणे महादेव मंदिरात येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नंदूही अधूनमधून गंगेश्वर मंदीरात दर्शनासाठी येत होता.आज मात्र नंदूचा मृतदेह मंदीरातील पिंडीवर आढळून आल्याने नंदूच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. नंदु घुंघासे या युवकाचा मृतदेह ज्या अवस्थेत महादेवाच्या पिंडीवर आढळून आला ते पाहता अघोरी अंधश्रद्धेतून हत्या किंवा आत्महत्या झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलीसांनी वर्तविला आत्महत्येचा अंदाज..
कहारवाडा पैठण येथील युवक नंदू घुंगासे याने गंगेश्वर महादेव मंदिरात आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी गळ्यावर झालेले वार लक्षात घेता असे मत व्यक्त केले असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.